Almatti dam | अलमट्टीतून पुन्हा विसर्ग वाढवला, सांगली, कोल्हापूरला दिलासा

file photo
file photo

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : अलमट्टी धरणातून (Almatti dam) शुक्रवारी सकाळी नऊ वाजल्यापासूनच पाण्याचा विसर्ग वाढवून सव्वा दोन लाख क्यूसेक करण्यात आला आहे. या हंगामातील हा सर्वाधिक विसर्ग आहे. अलमट्टीतून काल गुरुवारी २ लाख क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात राहिली आहे.

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील महापुरास कारणीभूत ठरणार्‍या कर्नाटकातील अलमट्टी धरणातून सोमवारी ५० हजार असणारा विसर्ग मंगळवारी १ लाख करण्यात आला होता. बुधवारी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून या धरणातून एक लाख क्यूसेकपेक्षा जादा पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर विसर्ग दोन लाखांपर्यंत करण्यात आला होता. आता पुन्हा विसर्ग (Almatti dam) वाढवण्यात आला आहे.

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती 'जैसे थे' आहे. नद्यांच्या पाणी पातळीतील वाढ कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ७५ बंधारे पाण्याखाली असून, ५४ मार्गांवरील वाहतूक बंद आहे. ही वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू ठेवण्यात आली आहे. करूळ घाट वाहतुकीसाठी बंदच असल्याने कोकणात जाणारी वाहतूक भुईबावडा घाटासह राधानगरी-फोंडा घाटमार्गे सुरू आहे. करूळ घाटातून कोकणात विशेषत: गोवा राज्य आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणारी एस.टी. वाहतूक फोंडा घाटमार्गे वळविण्यात आली आहे.

 हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news