हिरण्यकेशी नदीला पूर; भडगाव पूलावर पाणी, गडहिंग्लज-चंदगडचा थेट संपर्क तुटला | पुढारी

हिरण्यकेशी नदीला पूर; भडगाव पूलावर पाणी, गडहिंग्लज-चंदगडचा थेट संपर्क तुटला

गडहिंग्लज : पुढारी वृत्तसेवा; पश्‍चिम घाटासह कोकणपट्ट्यात सुरु असलेल्या धुवाँधार पावसाने हिरण्यकेशी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ होऊन पाणी पात्राबाहेर पडले आहे. गुरुवारी रात्रीपासून चंदगड राज्यमार्गावरील महत्त्वाचा भडगाव पूल पाण्याखाली गेल्याने गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्व तसेच दक्षिण भागासह चंदगड तालुक्याचा थेट संपर्क तुटला आहे. सध्या भडगाव पूलावर दीड फुटांहून अधिक पाणी असून, पोलिसांनी बॅरिकेट्स लावून वाहतूक बंद केली आहे. दरम्यान जरळी पूलही रात्रीपासून पाण्याखाली गेला असून, पूर्व भागातील गावे संपर्कहीन झाली आहेत.

गेल्या शनिवारपासून तालुक्यात संततधार पाऊस होत आहे. कोकणपट्ट्यासह आजरा तालुक्यात अतिवृष्टीसदृश पाऊस सुरु आहे. चार दिवसांपूर्वी हिरण्यकेशी नदीवरील निलजी व ऐनापूर बंधारे पाण्याखाली गेले होते. गेले दोन दिवस तालुक्यात पावसाचा जोर कमी असला तरी पश्‍चिम घाटात संततधार कायम आहे. तीन दिवसांपूर्वी चित्री मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने सांडव्यातून विसर्ग सुरु झाला आहे. परिणामी हिरण्यकेशीने इशारा पातळी गाठली आहे. रात्री १० पासून भडगाव पूलावर पाणी येण्यास सुरुवात झाली होती. पहाटे सहा वाजता दीड फुटांहून अधिक पाणी आल्याने वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे.

पूर्व भागातील निलजी हे बंधारे यापूर्वीच हंगामात दुसर्‍यांदा पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे जरळी व भडगाव पूलावरूनच ही वाहतूक सुरु होती. आता दोन्ही मार्ग बंद झाल्याने विद्यार्थी, नोकरदारांची कोंडी झाली आहे. नांगनूर पुलाला पाण्याने स्पर्श केला आहे. मात्र तो वाहतुकीस खुला असल्याने पूर्व भागातील गावांना संकेश्‍वरमार्गे वाहतुकीचा पर्याय आहे. चंदगड मार्गावरील वाहतूक गजरगावमार्गे वळविण्यात आली आहे.

पावसाचा जोर कायम राहिल्यास पाणीपातळी आणखी वाढून नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरण्याचा धोका आहे. तालुका प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दुसरीकडे घटप्रभा नदीचे पाणीही इशारा पातळीकडे गेले असून, तावरेवाडी-कानडेवाडी दरम्याच्या बंधार्‍याजवळही अधिक पाणीपातळी आहे. त्यामुळे तूर्तास तरी सांबरे भागातील गावांना दिलासा मिळाला आहे. हडलगेचा जुना बंधारा पाण्याखाली गेला असला तरी नव्या पुलामुळे वाहतूक सुरळीत सुरु आहे.

हेही वाचा : 

Back to top button