सांगली जिल्ह्यात पूर्वभागासह सर्वत्र पाऊस | पुढारी

सांगली जिल्ह्यात पूर्वभागासह सर्वत्र पाऊस

सांगली; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात व धरण परिसरात गुरुवारी मध्यम पावसाने हजेरी लावली. शिराळा, वाळवा, मिरज, पलूस, कडेगाव तालुक्यात चांगला पाऊस पडला. पूर्वभागात हलक्या सरी कोसळल्या. वातावरण सर्वत्र ढगाळ होते. वारा सुसाट असल्याने वातावरणात गारवा आहे. लोक थंडीने हैराण झाले आहेत. पाऊस व थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

गेल्या चार दिवसांत जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. मंगळवार, बुधवारी काहीशी उघडीप होती, पण गुरुवारपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली. सांगली, मिरज, इस्लामपूर शहरासह बहुतांश तालुक्यात पावसाने हजेरी लावली. शिराळा तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. इतर तालुक्यात मध्यम ते हलका पाऊस पडत आहे.

जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 4.4 मिमी पाऊस पडला. शिराळा तालुक्यात सर्वाधिक 23.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जूनपासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे : मिरज -1 (291.4), जत -0.5 (266.7), खानापूर-विटा -1.1 (344.5), वाळवा-इस्लामपूर -7 (435), तासगाव -3 (287.9), शिराळा -23.5 (857.8), आटपाडी- 0.1 (214.9), कवठेमहांकाळ-1.1 (379.6), पलूस-2.7 (252.2), कडेगाव -2.3 (340.4).

वाहतूक रोडावली

पावसाची रिपरिप सतत सुरू आहे. हवेत कमालीचा गारवा आहे. काहीवेळा सुसाट वारा सुटत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे लोक फारसे बाहेर पडत नाहीत. महत्वाचे काम असेल तरच लोक शहर अथवा गावात येत आहेत. बहुतेकजण घरी राहणे पसंद करीत आहेत. केवळ शाळा, कार्यालयात जाण्या-येण्यासाठी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावर फारशी गर्दी दिसत नाही.

Back to top button