आयसीयू फुल्ल ऑक्सिजन बेडला वेटिंग ; नगर जिल्हा रुग्णालयातील स्थिती

आयसीयू फुल्ल ऑक्सिजन बेडला वेटिंग ; नगर जिल्हा रुग्णालयातील स्थिती
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यात डेंग्यूसह विविध साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात (ओपीडी) दररोज 1100 पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी सुरू आहेत. मात्र, जिल्हा रुग्णालयात ना आयसीयू बेड आहेत, ना ऑक्सिजन बेड रिकामे. त्यामुळे आजमितीला 282 खाटा असलेल्या जिल्हा रुग्णालयात 322 रुग्ण दाखल आहेत. राज्यातील काही जिल्हा रुग्णालय आणि तेथील उपचार पद्धतीविषयी जोरदार चर्चा सुरू आहे.

संबंधित बातम्या : 

काही ठिकाणी औषधे नाहीत, तर काही ठिकाणी उपचारात हलगर्जीपणा केला जात असल्याचे आरोप सुरू आहेत. मात्र, नगरच्या जिल्हा रुग्णालयात औषधसाठा पुरेसा असला, तरी मनुष्यबळाची कमतरता आणि खाटांची अपुरी व्यवस्था यामुळे रुग्णांना या ठिकाणी उपचार मिळणे मुश्कील झाल्याचे वास्तव आहे. जिल्हा रुग्णालयात 15 ऑगस्टपासून मोफत उपचार सुरू असल्याने 'ओपीडी'तील रुग्णसंख्या वाढली आहे. पूर्वी येथे दररोज 450-500 असलेली संख्या आज 1100 च्या पुढे गेली आहे. त्यामुळे रुग्ण अ‍ॅडमिटचे प्रमाणही वाढले आहे.

'आयसीयू'मध्ये जागा नाही
अतिदक्षता विभागात (आयसीयू) 18 खाटा आहेत. मात्र मंगळवारी या सर्व खाटांवर रुग्ण असल्याने नवीन रुग्णाला जागाच मिळत नाही. त्यामुळे मंगळवारी (दि. 3) जामखेड येथील रुग्णाला अत्यवस्थ अवस्थेतच खासगी हॉस्पिटलमध्ये हलवावे लागले. यासह आणखी काही रुग्णांनाही नातेवाइकांनी 'खासगी'त हलविल्याचे समजले. प्रशासनाकडून अशा रुग्णांना 'ट्रॉमा सेंटर'मध्ये शिफ्ट केल्याचेही दिसले.

ऑक्सिजनच्या 200 खाटाही फुल्ल
जिल्हा रुग्णालयात 200 खाटांवर ऑक्सिजनची व्यवस्था आहे. आयसीयूमध्ये जागा नसल्यास त्या रुग्णांची व्यवस्था नातेवाइकांच्या सहमतीने ऑक्सिजन खाटांवर केली जाते. मात्र मंगळवारी या 200 खाटादेखील फुल्ल असल्याने नवीन रुग्णांना दाखल करता येत नव्हते. गेल्या 15 दिवसांपूर्वी 282 क्षमता असलेल्या जिल्हा रुग्णालयात 400 रुग्ण अ‍ॅडमिट होते. यातील क्षमतेपेक्षा वाढीव असलेल्या 118 रुग्णांची कोविडसाठी तयार केलेल्या काही खाटांवर, तर कुठे जमिनीचाही आधार घ्यावा लागल्याचे समजते.

दिवसाला सात मृत्यू!
जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदनगृहात सप्टेंबर 2023 या महिन्यांत 189 मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आल्याचे आकडे सांगतात. यात जिल्हा रुग्णालय आणि बाहेरील रुग्णालयांतील सर्वच वयोगटांतील रुग्णांचा समावेश होता.

डेंग्यूचे महिन्यात 39 रुग्ण?
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महिनाभरात 39 रुग्णांना डेेंग्यूची लागण झाली असून, यातील काही रुग्ण बरे झाले आहेत. काही ठिकाणी रुग्णांची संख्याही वाढल्याचेही सांगण्यात येते.

जिल्हा रुग्णालयात मनुष्यबळ आणि खाटांचा प्रश्न भेडसावत असला, तरीही आम्ही पर्यायी बेड तयार करून रुग्णांवर उपचार करत आहोत. येत्या काळात खाटा आणि मनुष्यबळाचा प्रश्नही निश्चितच मार्गी लागेल.
                                         – डॉ. संजय घोगरे, जिल्हा शल्यचिकित्सक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news