Vladimir Putin : पुतीन यांच्या डोक्यातून Moscow is Silent हे शब्द गेलेच नाहीत, आणि शेवटी..

Vladimir Putin : पुतीन यांच्या डोक्यातून Moscow is Silent हे शब्द गेलेच नाहीत, आणि शेवटी..

पुढारी ऑनलाईन डेस्क : व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) जेव्हा जर्मनीतून सेंट पिटर्सबर्गला परत आले तेव्हा त्यांचं वय ३७ होतं. केजीबीचे ऑफिसर असलेल्या पुतिन यांचे त्यावेळी सेव्हिंग फक्त २०० पाऊंड इतके कमी होते. पुढील काही काळात सोव्हीएत रशियाचे विघटन झालं. ही घटना पुतीन यांना सहन होण्यासारखी नव्हती.

पुतिन (Vladimir Putin) यांचा जन्म १९५२ला लेनिनग्राड या शहरातील एका झोपडपट्टीत झाला होता. पुतिन हे त्यांच्या आईवडिलांचे एकमेव अपत्य होते.

पुतिन (Vladimir Putin) यांचे वडिल कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य होते आणि फोरमन म्हणून काम करायचे. तर आई मारिया प्रयोगशाळेत स्वच्छता करणे, बेकरीत काम करणे अशी लहानसहान कामे करायची. लेनिनग्राडवर जेव्हा नाझी फौजांनी हल्ला केला होता, तेव्हा पुतिन यांच्या आई कशाबशा बचावल्या होत्या.

माझी आई भुकेने चक्कर येऊन कोसळली होती. लोकांना वाटलं ती मेली. तिला मृतदेहांत ठेवण्यात आलं होतं, अशी आठवण स्वतः पुतिन यांनी सांगितली आहे.

मारिया यांना दोन मुलं झाली होती, पण ती दगावली. त्यामुळे पुतिन यांचा उल्लेख 'मिरॅकल बेबी' असा केला जातो.

पुतिन (Vladimir Putin) यांचं बालपण गरिबीत गेले. त्यांच्या घरात मोठ्या प्रमाणावर उंदीर होते. उंदरापासून बचाव करण्यासाठी कसा आटापिटा करावा लागत असे हे त्यांनीचं लिहिलेले आहे.

२०१५ ला ते म्हणाले होते, "लेनिनग्राडच्या रस्त्यांनी मला एक शिकवलं आहे, जर लढाई टाळताच येत नसेल तर पहिला ठोसा आपण लगावला पाहिजे."

१९७५ला पुतिन केजीबी या गुप्तहेर संघटनेत दाखल झाले. सोव्हीएत रशियाचं पतन म्हणजे २० व्या शतकातील सर्वांत मोठी भूराजकीय घटना आहे, असे ते म्हणत. १९९७ ला ते चिफ ऑफ फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस पदावर नियुक्त झाले. १९९९ ला बोरिस येलत्सिन यांनी पदभार सोडला आणि पुतीन यांची नियुक्ती हंगामी राष्ट्राध्यक्ष म्हणून झाली.

२००० ची निवडणूक जिंकल्यानंतर मात्र पुतिन यांनी अत्यंत कुटीलरित्या सर्व विरोधकांना संपवत, रशियावर निरंकुश सत्ता प्रस्थापित केली.

पुतिन यांनी रशियाची अर्थव्यवस्था रुळावर आणली. हे करत असताना वेगवेगळ्य लष्करी मोहिमाही यशस्वी केल्या. २००८ मध्ये जॉर्जियाचा काही भाग रशियाने गिळंकृत केला, त्यानंतर क्रिमियाही ताब्यात घेतले. तर २०१४ ला युक्रेनमधील फुटीरतावद्यांना पाठबळ दिले. सीरियातील रशियाचा हस्तक्षेपही जगाने पाहिलेला आहे.

१९८९ ला बर्लिनची भिंत कोसळली तेव्हा पुतिन डर्सडेनमध्ये होते. साम्यवाद पूर्व जर्मनीच्या रस्त्यांवर शेवटच्या घटका मोजत होता. रस्त्यावर मोर्चे, आंदोलनं सुरूच होती. आंदोलकांच्या एक गटाने तिथल्या केजीबीच्या कार्यलयावर चाल केली. गेटवरील सुरक्षारक्षक धावतच आत आला. तेव्हा केजिबीच्या एका अधिकाऱ्यांने या जमावला सामोरे जाण्याचे धाडस दाखवले. ते अधिकारी म्हणजे पुतिन. पुतिन या जमावाला उद्देशून म्हणाले, "आमच्या प्रॉपर्टीत येऊ नका. माझ्या सहकाऱ्यांकडे शस्त्र आहेत. आणीबाणीच्या काळात आम्हाला शस्त्र वापरण्याची पूर्ण मुभा आहे," पुतिन यांच्या या गर्भित इशाऱ्याने तो जमाव परतला.

पण पुतिन यांनी ओळखले होते की परिस्थिती जोखमीची आहे. त्यांनी रेड आर्मीला फोन करून मदत मागितली. "आम्ही मास्कोच्या आदेशाशिवाय काही करू शकत नाही. आणि मास्को शांत आहे. Moscow is Silent"

Moscow is Silent हे शब्द पुतिन यांच्या डोक्यातून जात नव्हते. युक्रेनच्या रस्त्यावर आता जे रक्त सांडत आहे, त्याची सुरुवात खरे तर १९८९ला झाली होती, असे म्हटले जाते.

बोरिस रिश्टर या लेखकाने पुतिन यांचे जर्मनीत चरित्र लिहिलेले आहे. ते म्हणतात, "पुतीन समजून घेण्यासाठी त्यांचे जर्मनीतील दिवस समजून घेणे फार आवश्यक आहे. जर्मनीच त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा जन्माला आल्या. पण त्याचवेळी राजकीय सत्ता सर्वसामान्य जनता कशी फेकून देते, याच्या वास्तवाने त्यांना अस्वस्थही केले."

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news