Ukraine-Russia war : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी ‘प्लॅन बी’ | पुढारी

Ukraine-Russia war : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी ‘प्लॅन बी’

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : रशियाच्या हल्ल्यामुळे (Ukraine-Russia war) युक्रेनमधील ‘एअर स्पेस’ बंद करण्यात आली असून, अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी गेलेल्या एअर इंडियाच्या विमानाला माघारी फिरावे लागले आहे. युक्रेनमधील भारतीयांसाठी आता भारत सरकारने ‘प्लॅन बी’वर काम सुरू केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.

खास अडकलेल्या भारतीयांसाठी म्हणून युक्रेनची राजधानी कीव्हमधील भारतीय दूतावास बंद न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या कुटुंबीयांनी संयम राखावा, सरकार प्रत्येक भारतीयाला सुरक्षितपणे मायदेशी आणेल, असे केंद्र सरकारकडून आश्‍वस्त करण्यात आले आहे.

संबंधित घडामोडी… (Ukraine-Russia war)

* युक्रेनची राजधानी कीव्ह येथे अनेक बॉम्बस्फोट झाल्याने कीव्ह विमानतळ रिकामे करण्यात आले आहे.
* युक्रेनच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हिटलर पुतीनकडे हसून पाहात आहे आणि कौतुकाने त्याचा गाल थोपटत आहे, असे अर्कचित्र शेअर करण्यात आले आहे.
* युक्रेनच्या कुठल्याही शहराला, नागरी वस्तीला लक्ष्य केलेले नाही. असा दावा रशियाने केला आहे.
* कीव्हमध्ये युक्रेनचे लढाऊ विमान कोसळले यात 14 सैनिक ठार झाले.
* भारताचे परराष्ट्र राज्य मंत्री व्ही. मुरलीधरन यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसह 18 हजार भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जात असल्याचे सांगितले.

Back to top button