पुढारी ऑनलाईन डेस्क : WTC फायनलमध्ये भारताच्या दुसऱ्या डावात ४९ धावा करून विराट कोहली बाद झाला. कोहलीने ज्या पद्धतीने स्लिपमध्ये कॅच दिला त्यावर बरीच टीका होत आहे. भारतीय फलंदाजांच्या खराब फॉर्मवर सुनील गावस्करही संतापले आहेत. कोहली ज्या पद्धतीने बाद झाला त्यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
ऑस्ट्रेलियाने भारताचा २०९ धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावले. भारतीय संघाने पहिल्या तीन विकेटस् शंभरीच्या आत गमावल्यानंतर विराट आणि अजिंक्य यांनी संयमी खेळ केला. त्यामुळे या जोडीवर भारतीय चाहत्यांच्या आशा एकवटल्या होत्या. नशिबाने साथ दिली तर हे दोघे उरलेल्या २८० धावा पार करण्यास भारताला मोठी मदत करतील, असे वाटत होते; पण पाचव्या दिवसाची सुरुवातच खराब झाली. बोलँडने टाकलेल्या ४७ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर घात झाला. बोलंडने टाकलेला चेंडू बाहेर जात होता अन् विराट त्यावर ड्राईव्ह मारायला गेला. चेंडूने विराटच्या बॅटची किनार घेतली अन् स्टिव्हन स्मिथने स्लिपमध्ये अफलातून झेल घेतला. विराट ७८ चेंडूंत ७ चौकारांसह ४९ धावांवर बाद झाला अन् अजिंक्यसह त्याची ८६ धावांची भागीदारी संपुष्टात आली. त्यानंतर पहिल्या डावात झुंजारवृत्ती दाखवणारा रवींद्र जडेजाही (०) भोपळ्यावर बाद झाला आणि भारताच्या पराभवाची औपचारिकता शिल्लक राहिली होती.
भारताच्या पराभवावर गावस्कर म्हणाले की, "भारताची फलंदाजी खूपच खराब होती. शेवटच्या दिवशी तर अत्यंत लाजिरवाणा खेळ होता. चेतेश्वर पुजारा काल अतिशय खराब खेळला, त्याच्याकडून अशी अपेक्षा केली नव्हती. कदाचित कोणीतरी त्याच्या डोक्यात स्ट्राइक रेट, स्ट्राइक रेट असं ओरडत असेल. एका सत्रात आठ विकेट्स, तुम्ही एकही सत्र खेळला नाही" असा संताप त्यांनी व्यक्त केला.
कोहलीच्या विकेटबद्दल गावस्कर म्हणाले, "तो चेंडू बाहेर जात होता, याआधी ऑफ-स्टंपच्या बाहेरचे चेंडू तो सोडत होता, कदाचित त्याला वाटले असेल की अर्धशतक पूर्ण करण्यासाठी एक धाव आवश्यक आहे, जेव्हा तुम्ही यशाच्या जवळ असता तेव्हा असे होते. जडेजासोबतही असे घडले, त्याने खेळायला नको असलेलाच चेंडू खेळला. रहाणेच्या बाबतीतही तेच झाले. अचानक प्रत्येकाला असे चेंडू खेळण्याची काय गरज होती. कोहलीने चुकीचा शॉट मारला, कोहलीला त्याबद्दल विचारले पाहिजे. तो म्हणत असतो की, सामने जिंकण्यासाठी मोठ्या भागीदारीची गरज असते. तो स्टंपच्या बाहेरचा चेंडू खेळत असेल तर मोठी भागीदारी कशी करणार," असेही गावस्कर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :