WTC Final 2023 :पराभूत मानसिकता

WTC Final 2023 :पराभूत मानसिकता
Published on
Updated on

एखादा सामना हरल्याचे दुःख हे असतेच; पण तो सामना कसा हरतो याच्यावर त्या दुःखाची तीव्रता जास्त अवलंबून असते. कोहली-रहाणे मैदानावर, 280 धावा काढायला 90 षटके हे गणित तसे सोपे वाटते; पण ते गणित सोडवायला मैदानात निग्रह लागतो, तो गावस्कर, द्रविड, लक्ष्मण किंवा तेंडुलकरच्या घराण्यातला. जेव्हा ती ऐतिहासिक कसोटी (सध्याचा प्रशिक्षक) द्रविड-लक्ष्मणने फिरवली तेव्हा त्यांनी विजयाचे गमक सांगितले. आम्ही प्रथम दिवस खेळायचा विचार केला आणि दडपण आले; मग आम्ही सत्राचा विचार केला आणि त्याहून पुढे जाऊन फक्त पुढची ओव्हर टिकून राहायचे आहे, इतकाच विचार केला आणि दिवस खेळून सामना फिरवला. यात प्रश्न ईडन गार्डन्स आणि ओव्हलच्या खेळपट्टीच्या वातावरणाचा आहे; पण त्याहून जास्त फरक आहे तो आपल्या मानसिकतेचा. आपल्याला तिथे उभे तंबू ठोकून राहायचे आहे, हे मनावर ठसवलेले भारताच्या कुठच्याच फलंदाजात दिसले नाही. हा पराभव भारतीय संघाच्या क्रिकेटचा होताच; पण त्याहून जास्त होता तो आपल्या मानसिकतेचा आणि पर्यायाने डावपेचांचा. किंबहुना, डावपेचांचा अभाव हाच प्रामुख्याने दिसला. पहिल्या दिवसाच्या दुसर्‍या सत्रातच आपण कसोटी हरलो होतो; पण व्हेंटिलेटरवर असलेल्या आपल्या संघाची धडपड अधिकृतरीत्या पाचव्या दिवशी संपली. या पराभवाची कारणमीमांसा करायची, तर सुरुवात कर्णधार आणि प्रशिक्षकाकडून करावी लागेल. (WTC Final 2023)

राहुल द्रविड स्वतः या तारणहाराच्या भूमिकेतून अनेकदा गेला आहे; पण त्याचा अनुभव डावपेच रचायला संघाला कुठेच होत असलेला दिसला नाही. बॅटिंग कोच विक्रम राठोड आणि बॉलिंग कोच पारस म्हांब्रे यांची नक्की भूमिका काय? भारतीय फलंदाज आपला ऑफ स्टम्प सोडून बाद होत होते किंवा स्लिपच्या जाळ्यात सहज अडकत होते. कसोटी दर्जाचे क्रिकेट खेळणार्‍या खेळाडूंना फलंदाजीचे तंत्र सांगायची गरज नसते; पण त्यांचा एखाद्या परिस्थितीत अ‍ॅप्रोच कसा हवा किंवा गोलंदाजांची लाईन आणि लेंग्थ कशी असायला हवी, याचे धडे राठोड आणि म्हांब्रे गुरुजींनी दिले असते, तर सगळी मुले एकदम कशी नापास झाली? जगातले उत्तम प्रशिक्षक हे संघाला मिळायला हवेत. परदेशी प्रशिक्षकांची शिस्त नको, तरी त्याने विजय मिळत असतील तर ते गरजेचे आहे. (WTC Final 2023)

भारतीय कर्णधार रोहित शर्मा याची संघ निवड आणि नाणेफेकीचा निर्णय हे भारताच्या पराभवाचे मूळ कारण ठरले. ऑफ स्पिनरला कायम अडखळणार्‍या ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपण अश्विनला खेळवले नाही, तर उमेश यादवला खेळवले. जो आपला धड तिसरा, ना चौथा गोलंदाज होता. पहिल्या दिवशी पहिला तास फक्त ढगाळ हवा असून, ऑस्ट्रेलियन मार्‍याला निव्वळ घाबरून या वातावरणाचा फायदा उठवणारे पुरेसे गोलंदाज आपल्याकडे नसताना आपण गोलंदाजी घेतली. पहिल्या सत्रात माफक यश मिळाले; पण ट्रेव्हिस हेडला आखूड टप्प्याचा मारा करत आक्रमक क्षेत्ररक्षण लावले नाही. थोडक्यात, आपण विकेट मिळवायचा प्रयत्न करण्याऐवजी विकेटची वाट बघत बसलो. पहिल्या दिवशी तिसर्‍या सत्रात आपण तब्बल 157 धावा दिल्या. त्या रोखायला रोहित शर्माचे कुठचेच डावपेच नव्हते.

इंग्लंडमध्ये ड्यूक चेंडूवर गोलंदाजी करताना स्विंगइतकाच सिमवर भर दिला जातो. सुरुवातीला आपण क्रॉस सिम, वॉबल सिमचा उपयोग केला; पण सिम पोझिशनच्या वैविध्याचा उपयोग ज्या पद्धतीने इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच खेळणार्‍या बोलँडने केला, त्याच्या तसूभरही आपण केला नाही. आपल्या गोलंदाजांची लाईन आणि लेंग्थ दोन्ही स्वैर होती. याउलट एकाच टप्प्यावरून ऑस्ट्रेलियन गोलंदाज चेंडू आत आणि बाहेर वळवून आपल्याला सतावत होते. फिरकी गोलंदाजीत नॅथन लायनने राऊंड द विकेट मारा करत बॅटच्या बाहेरच्या आणि आतल्या कडेचा वेध उत्तम घेतला आणि आपल्या ड्रिफ्ट आणि फ्लाईटचा वापर करत सरळ चेंडूवर पायचीत करायची शक्यता कायम ठेवली.

भारतीय फलंदाजांच्या फटक्यांची निवड हा चिंतेचा विषय आहे. पहिल्या डावात चुकीच्या पद्धतीने चेंडू सोडणे आणि दुसर्‍या डावात चुकीचे फटके निवडणे हे भारताच्या फलंदाजीच्या अपयशाचे मुख्य कारण. विशेषतः, दुसर्‍या डावात जेव्हा धावा किंवा वेळेच्या रूपात लक्ष्य नक्की आहे हे माहीत असताना रोहित शर्मा, पुजारा, कोहली, जडेजा आणि रहाणे यांनी आपल्या विकेटस् बहाल केल्या. आपले फलंदाज प्रत्येक चेंडूचे मोल ओळखून खेळण्याऐवजी जणू काही वैयक्तिक लक्ष्य गाठण्याच्या घाईत होते.

दोन महिने आयपीएल खेळल्यावर टी-20 ची सवय बॅटला लागलेली असते. इंग्लंडमध्ये खेळायचे असल्यास तिथल्या हवेत सराव सामने खेळायला पर्याय नाही. एकट्या पुजाराच्या सरावाच्या जोरावर आपण सामना जिंकू शकत नाही. ऑस्ट्रेलियन खेळाडू ताजेतवाने होते, उत्तम सराव घरून करून काही आले होते, तर काही कौंटी क्रिकेट खेळून आले होते. जरी अ‍ॅशेसची पूर्वतयारी म्हणून ते हा सामना खेळात नव्हते, तरी या विजयाने त्यांनी इंग्लंडला वॉर्निंग द्यायचे दुहेरी काम केले आहे. पुन्हा एकदा आयसीसी ट्रॉफी हातातून घालवायची नसेल, तर खेळाडूंची निवड, राखीव फळी, त्यांचे वर्कलोड मॅनेजमेंट आणि रिझल्टस् देणारे प्रशिक्षक या चार बाबींवर 'बीसीसीआय'ने आताच लक्ष देणे गरजेचे आहे.

– निमिष पाटगावकर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news