पुढारी ऑनलाईन डेस्क : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. या पराभवाची संपूर्ण जबाबदारी भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने घेतली आहे. आम्ही पहिल्या सेशनमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. मात्र, त्यानंतर चांगली गोलंदाजी करण्यात अपयश आले. खराब फलंदाजीमुळे पराभवाला सामोर जावे लागले, असे राेहित शर्माने सामन्या नंतर आयाेजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. (Rohit Sharma On WTC)
इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा २०९ धावांनी दणदणीत पराभव केला. WTC फायनलमधील भारताचा हा सलग दुसरा पराभव आहे. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाने नववी आयसीसी ट्रॉफी जिंकली. आयसीसीच्या सर्व फॉरमॅटमध्ये वर्ल्डकप जिंकणारा पहिला संघ ठरला आहे.
सामना गमावल्यानंतर निराश झालेल्या रोहित शर्माने सांगितले की, "आम्ही वेगळी योजना आखली होती. दुसऱ्या डावात आम्ही आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला. वेगवान फलंदाजीमुळे कधी यश मिळते तर कधी अपयशही येते. पुढील WTC फायनलसाठी ३ सामन्यांची मालिका अधिक चांगली होईल." अशी अपेक्षाही त्याने व्यक्त केली. (Rohit Sharma On WTC)
शुभमन गिलला आऊट देण्याच्या निर्णयावर रोहित म्हणाला, "थर्ड अंपायरच्या निर्णयाने थोडा निराश झालो. आयपीएलमध्ये 8 ते 10 अँगल वापरण्यात आले होते; पण ते इथे का वापरले गेले नाहीत? माहीत नाही, पण निर्णय विसरला आहे. तुम्हाला सामन्यात पुढे जावे लागेल." (Rohit Sharma On WTC)
रोहित पुढे म्हणाला, "पहिल्या डावात 5 बाद 150 अशी घसरण झाल्यानंतर, शार्दुल आणि रहाणेने चांगली फलंदाजी केली. तिथे आम्ही चांगले पुनरागमन केले. दुसऱ्या डावातही आम्ही चांगली गोलंदाजी केली, पण जेव्हा फलंदाजीचा प्रश्न आला, तेव्हा आम्हाला चांगली कामगिरी करता आली नाही. (Rohit Sharma On WTC)