Kohli Century Record : कोहलीच्या तुफानी खेळीने घातला विक्रमांचा धुमाकूळ! नोंदवले गेले ‘हे’ 5 कारनामे

Kohli Century Record : कोहलीच्या तुफानी खेळीने घातला विक्रमांचा धुमाकूळ! नोंदवले गेले ‘हे’ 5 कारनामे
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Kohli Century Record : आयपीएलच्या 16 व्या हंगामात विराट कोहलीला शतक झळकावण्यात यश आले. त्याने तब्बल 1489 दिवसांनंतर शतकी खेळी साकारली. त्याने शेवटचे शतक 19 एप्रिल 2019 रोजी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध ईडन गार्डन्सवर फटकावले होते. त्यानंतर 18 मे 2023 रोजी, विराटने हैदराबादमध्ये सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध शतक साजरे केले. आयपीएलच्या 63 डावांनंतर त्याला 100 धावांचा टप्पा गाठण्यात यश आले आहे. त्याचे आयपीएल कारकिर्दीतील हे सहावे शतक ठरले.

विराट कोहलीच्या या शतकामुळे आयपीएलमध्ये अनेक विक्रम रचले गेले. यादरम्यान त्याने फाफ डू प्लेसिससोबत भागीदारीचा अनोखा विक्रमही केला.

आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच (Kohli Century Record)

1. हैदराबादमध्ये झालेल्या आरसीबी विरुद्ध एसआरएच सामन्यात कोहली (बेंगलोर) आणि हेनरिक क्लासेन (हैदराबाद) यांनी शतके झळकावली. प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांनी शतकी खेळी साकारण्याची ही आयपीएलच्या इतिहासातील पहिली वेळ आहे. याआधी आयपीएलच्या सामन्यांत एकाच संघातील दोन खेळाडूंच्या बॅटमधून शतके झळकली आहेत. कोहली आणि एबी डिव्हिलियर्सने 2016 मध्ये गुजरात लायन्सविरुद्ध अशी कामगिरी केली होती. तर, डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना 2019 मध्ये आरसीबी विरुद्ध शतके झळकावली होती.

विराटने केली ख्रिस गेलची बरोबरी, तर राहुल-रोहितचा मोडला विक्रम

2. विराट कोहलीची आयपीएल करिअरमध्ये 6 शतके झाली आहेत. आता तो कॅरेबियन फलंदाज ख्रिस गेलच्या बरोबरीने आला आहे. दोघांच्या नावावर आता 6-6 शतके आहेत. कोहलीच्या नावावर टी-20 फॉरमॅटमध्ये 7 शतकांची नोंद झाली आहे. त्याने याबाबतीत रोहित शर्मा आणि केएल राहुलला मागे टाकले आहे, ज्यांच्या नावावर 6-6 शतके आहेत. (Kohli Century Record)

भागीदारीचा विक्रम

3. कोहली आणि फाफ डु प्लेसिसने या आयपीएलमध्ये 872 धावांची भागीदारी केली आहे. आयपीएलच्या एकाच आवृत्तीत सलामीच्या जोडीने केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत.
872 धावा : कोहली-डू प्लेसिस, 2023 (13 डाव)
791 : जॉनी बेअरस्टो-डेव्हिड वॉर्नर, 2019 (10 डाव)
756 : डु प्लेसिस-ऋतुराज गायकवाड, 2021 (16 डाव)
744 : शिखर धवन-पृथ्वी शॉ, 2021 (15 डाव)
731 : शिखर धवन-वॉर्नर, 2016 (17 डाव)

लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीने केला 'हा' पराक्रम

4. आरसीबीने विजयी लक्ष्य गाठताना 187 केल्या. हा त्यांचा तिसरा सर्वाधिक यशस्वी पाठलाग आहे. यापूर्वी 2010 मध्ये आरसीबीने किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध 204 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. त्याचवेळी 2016 मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्सविरुद्धही त्यांनी 192 धावांचे आव्हान गाठले होते. हे दोन्ही रनचेस बंगळूरमध्ये झाले. कोहलीने जेव्हा 185 पेक्षा जास्त धावसंख्येचा पाठलाग केला तेव्हा त्याची सरासरी 35 डावात 32 राहिली आहे.

हैदराबादचे शतकवीर विदेशी

5. SRH च्या खेळाडूंनी IPL मध्ये आतापर्यंत 5 शतके झळकावली आहेत. ही सर्व शतके त्याच्या विदेशी खेळाडूंच्या बॅटमधून झळकली आहेत. SRH कडून खेळताना डेव्हिड वॉर्नर (2), जॉनी बेअरस्टो, हेनरिक क्लासेन आणि हॅरी ब्रूक यांनी 1-1 शतके झळकावली आहेत.

क्लासेनने फिरकीपटूंविरुद्ध 70 धावा चोपल्या

हेनरिक क्लासेनने आपल्या शतकी खेळीत केवळ फिरकी गोलंदाजांविरुद्ध 70 धावा वसूल केल्या. आयपीएलच्या एका डावात फिरकीपटूंविरुद्धची ही पाचवी सर्वोच्च धावसंख्या होती. क्लासेनने फिरकीपटूंविरुद्ध 29 चेंडू खेळले. यामध्ये 5 चेंडूत 5 चौकार आणि इतर 5 चेंडूत 5 षटकार मारले. ऋद्धिमान साहाने 2010 मध्ये आयपीएलमध्ये फिरकीपटूंविरुद्ध सर्वाधिक 80 धावा केल्या होत्या. हा सामना 1 जून 2014 रोजी खेळला गेला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news