पुढारी ऑनलाईन डेस्क : झारखंडमधील जमशेदपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे. धार्मिक ध्वजाची कथित विटंबना झाल्यानंतर शास्त्रीनगरमध्ये दोन गटांमध्ये हाणामारी झाली. हल्लेखोरांनी दगडफेक करत अनेक दुकाने आणि एक ऑटो रिक्षा पेटवून दिली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी रविवारी सायंकाळी परिसरात संचारबंदी लागू केली आहे. दरम्यान, आज (दि. १०) सकाळी निमलष्करी दलाने परिसरात फ्लॅग मार्च काढला. तणावाच्या पार्श्वभूमीवर मोबाईल इंटरनेट अंशतः बंद करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक प्रभात कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. आता परिस्थिती नियंत्रणात आहे. एकत्र जमलेल्या नागरिकांना घरी पाठवण्यात आले आहे. संपूर्ण परिसरात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
पूर्व सिंघभूम जिल्ह्याच्या उपायुक्त विजया जाधव यांनी सांगितले की, काही समाजकंटक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा हा डाव हाणून पाडण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी सहकार्य करावे. स्थानिक संघटनेच्या सदस्यांना रामनवमीच्या ध्वजाची विटंबना केल्याचे समजताच शनिवारी रात्रीपासून परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
दरम्यान, जमशेदपूरच्या हल्दीपोखरमध्ये ३१ मार्चच्या रात्री रामनवमीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली होती. रामनवमीची मिरवणूक जुगसलाई येथे पोहोचताच काही आंदोलकांनी मिरवणुकीवर दगडफेक सुरू केली. या घटनेने संतप्त झालेल्या लोकांनी बाटा चौकात हनुमान चालिसाचे पठण सुरू केले.
हेही वाचा