मुंबई, पुढारी वृत्तसेवा: विधीमंडळ सभागृहांचे कामकाज भारतीय संविधान, नियम, प्रथा आणि परंपरेने नुसार चालते. अलीकडच्या काळात बऱ्याच प्रथा, परंपरा आणि नियमांना आपण बगल देण्यात येत असल्याची गंभीर बाब विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. विविध आयुधांचा वापर करुन सदस्यांनी सादर केलेल्या सूचना मान्य किंवा अमान्य याची माहिती सदस्यांना मिळत नाही, कपात सूचनांची यादी सर्व सदस्यांना दिली जात नाही, तसेच ही यादी कार्यवाहीसाठी मंत्रालयीन विभागांना पाठवली की नाही याची माहिती देण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.
'ऑर्डर ऑफ डे' रात्री बारानंतर संकेतस्थळावर देण्यात येत असल्याने दुसऱ्या दिवशीच्या कामकाजाची माहिती सदस्यांसह मंत्र्यांना सुध्दा मिळत नाही, तरी यामध्ये तात्काळ सुधारणा करुन सभागृहाच्या नियम, प्रथा-परंपरांचे योग्य प्रकारे पालन करण्याची मागणी अजित पवार यांनी 'पॉईंट ऑफ प्रोसिजर'व्दारे सभागृहात केली. यावर योग्य ती सुधारणा करण्याचे आश्वासन विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.
अजित पवार म्हणाले, विधिमंडळ सदस्य अतिशय काळजीपूर्वक आणि जबाबदारीने आपल्या मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तारांकित प्रश्न, कपात सूचना इत्यादी आयुधांच्या सूचना आपल्या मान्यतेसाठी दाखल करीत असतात. विधिमंडळ सचिवांनी या सूचना मान्यतेसाठी आपल्याला सादर केल्यानंतर सूचना मान्य झाली किंवा अमान्य झाली, हे कळण्याचा सदस्यांचा घटनादत्त अधिकार आहे. परंतु गेल्या काही काळापासून ही परंपरा पाळली जात नाही. विधानसभा सदस्यांनी दाखल केलेला तारांकित प्रश्न स्वीकृत झाला किंवा आपल्या अस्वीकृत झाला याबाबतचे ज्ञापन संबंधित सदस्यांना सचिवालयाकडून देण्याची पद्धत बंद करण्यात आलेली आहे. तसेच संबंधित विभागांच्या मागण्या मतदानासाठी ज्या दिवशी कामकाज पत्रिकेत दाखविलेल्या असतात त्याच दिवशी अध्यक्षांनी मान्य केलेल्या कपात सूचनांची यादी सर्व सदस्यांना टपालाद्वारे प्राप्त व्हायची.
परंतु, सदस्यांना कोणतीही माहिती न देता कपात सूचनांची एकत्रित यादी पाठविणे बंद करण्यात आली आहे. तसेच हिवाळी अधिवेशनातील मान्य झालेल्या कपात सूचनांची यादी आजतागायत पुढील कार्यवाहीसाठी मंत्रालयीन विभागांना आणि सदस्यांना पाठविण्यात आलेली नाही. विधिमंडळ सदस्यांना 'ऑर्डर ऑफ द डे' आल्यानंतर आपली लक्षवेधी सूचना किंवा प्रश्नोत्तराच्या यादीत प्रश्न छापून आलेला दिसला. तर सदस्यांना त्या प्रश्नावरील पूरक प्रश्नाची तयारीही करता येत नाही. मात्र रोजची 'ऑर्डर ऑफ द डे' सुध्दा रात्री 12 नंतर उशिरा संकेतस्थळावर टाकली जाते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी कोणते कामकाज आहे. हे सदस्यांना कळत नाही. सदस्य तयारी करू शकत नाही. केवळ सदस्यच नाही मंत्र्यांना आणि विभागांना देखील त्या विषयावर संपूर्ण माहितीसह सभागृहात येण्यात अडचणीत येतात. तरी 'ऑर्डर ऑफ द डे' रात्री किमान दहा वाजेपर्यंत संकेतस्थळावर टाकण्याची मागणी पवार यांनी केली.
हेही वाचा