पिंपरी : महाराष्ट्राच्या हिताविरुद्ध तडजोड नाही; माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिपादन | पुढारी

पिंपरी : महाराष्ट्राच्या हिताविरुद्ध तडजोड नाही; माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिपादन

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : राज्यामध्ये तोडाफोडीचे राजकारण करून आलेले सरकार जनता नाकारेल. महाराष्ट्राच्या हिताविरुद्ध महाविकास आघाडी तडजोड करणार नाही. महाराष्ट्र झुकला नाही, झुकणार नाही. राज्यातून वेदांता-फॉक्सकॉनसारखा कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक असणारा प्रकल्प परराज्यात हलविण्यात आला. त्यामुळे लाखो तरुणांचा रोजगार गेला. या सर्व बाबी पाहता कोणाला निवडून द्यायचे, याचा निर्णय जनतेला घ्यायचा आहे, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी केले.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारानिमित्त पिंपळे निलख येथे आयोजित सभेत पवार बोलत होते. या प्रसंगी राज्याचे माजी सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, माजी मंत्री शशिकांत शिंदे, आमदार सुनील शेळके, राजेश राठोड, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, शिवसेनेचे शहरप्रमुख अ‍ॅड. सचिन भोसले, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम आदी उपस्थित होते.

भाजपचे माजी नगरसेवक तुषार कामठे, माजी नगरसेविका विजया सुतार, विजय सुतार, राजन नय्यर, प्रसाद कांबळे आदींनी या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पवार म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली. त्यांचे पुत्र तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडूनच शिवसेना पक्ष आणि चिन्ह काढून घेण्याचे काम झाले आहे. निवडणूक आयोगाने याबाबत घेतलेला निर्णय आवडलेला नाही. जनताच आगामी निवडणुकीत विरोधकांना योग्य जागा दाखवून देईल.

अंगातच पाणी नाही..
शहरासाठी आंद्रा, भामा आसखेड धरणाचे पाणी आणण्याचे काम सत्ताधारी भाजपने केले नाही. भाजप पदाधिकार्‍यांच्या अंगातच पाणी नाही. ते जनतेला पाणी कोठून देणार? लाथ मारेल तिथे पाणी काढण्याची धमक असायला हवी, अशी टीकाही अजित पवार यांनी केली.

भ्रष्टाचाराचे पुरावे जनतेसमोर ठेवणार
पिंपरी-चिंचवड महापालिकेत भ्रष्टाचार बोकाळला आहे. तो थांबविला पाहिजे. मनपामध्ये होणार्या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे महापालिका निवडणुकांच्या वेळी जनतेसमोर ठेवण्यात येईल. सध्या गेल्या 12 महिन्यांपासून निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत. राष्ट्रवादीने शहरात विकासकामे केली असताना जनतेने 2017 मध्ये नाकारले. आता 2023 मध्ये याबाबत आत्मपरीक्षण करुन जनतेने निर्णय घ्यायला हवा, असेही अजित पवार म्हणाले.

ही विकासाची निवडणूक
चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक ही भावनिक निवडणूक नाही. तर, ती विकासाची निवडणूक आहे. भाजपला स्वतःचे कार्यकर्ते तयार करता आले नाही. आम्ही तयार केलेले कार्यकर्ते फोडाफोडी करून घेतले. त्यांना आमदार केले, अशी टिप्पणी पवार यांनी केली.

Back to top button