अजित पवार हे राष्ट्रद्रोही; चहापानाला आले नाहीत हेच बरे झाले : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | पुढारी

अजित पवार हे राष्ट्रद्रोही; चहापानाला आले नाहीत हेच बरे झाले : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : विरोधी पक्षनेते अजित पवार हे सत्ता गेल्यामुळे पाण्याविना मासा तडफडतो तसे तडफडत आहेत. मला महाराष्ट्रद्रोही म्हणणारे अजित पवार हे दाऊदशी संबंध असल्याने तुरुंगात गेलेल्या आपल्या मंत्र्याचा राजीनामादेखील घेऊ शकले नाहीत. हा त्यांचा एकप्रकारचा देशद्रोहच आहे. त्यामुळे ते माझ्या चहापानाला आले नाहीत तेच बरे झाले. त्यांच्यासोबत चहा-पाणी घेतले असते, तर माझाही देशद्रोह ठरला असता. ते न आल्याने माझा देशद्रोह टळला आहे, असा सणसणीत पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घटनाबाह्य मुख्यमंत्री असून, त्यांनी उद्धव ठाकरे यांचा विश्वासघात करून महाराष्ट्रद्रोह केला आहे, अशी टीका अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली होती. या टीकेला एकनाथ शिंदे यांनी जशास तसे उत्तर दिले. अजित पवार हे मोठे नेते आहेत. परंतु, सत्ता गेल्यामुळे ते बेताल वक्तव्य करू लागले आहेत. मी कोणाचाही विश्वासघात केलेला नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सरकार स्थापन केले असून, हे सरकार राज्यातील जनतेलाही आवडले आहे. जनता आमच्यावर भरभरून प्रेम करत आहे. आम्हाला प्रतिसाद देत आहे; पण सत्ता गेल्यामुळे अजित पवार यांना पोटदुखी झाली आहे, असे शिंदे म्हणाले.

आम्हाला केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले आहे. आमचे सरकार राज्याच्या विकासासाठी झटपट निर्णय घेत आहे. अजित पवार यांना तेच जास्त खुपत आहे. ते उपमुख्यमंत्री असताना पक्षाच्या एका मंत्र्याचे दाऊदची बहीण हसीना पारकरसोबत आर्थिक हितसंबंध उघड झाले. त्यामुळे या मंत्र्याला तुरुंगात धाडण्यात आले. परंतु, अजित पवार यांनी त्यांचा राजीनामा घेतला नाही. पक्षाचे दोन-दोन मंत्री तुरुंगात गेले, तरी अजित पवार यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही. त्यामुळे घटनाद्रोहीपेक्षा राष्ट्रद्रोही असणे अधिक गंभीर आहे, असे एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांना सुनावत त्यांच्या टीकेला सभागृहात प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला.

‘वर्षा’वर बिर्याणी खाऊ घालत नाही

‘वर्षा’वर सहा महिन्यांत दोन कोटी 38 लाख रुपये चहापानावर खर्च झाल्याची टीका अजित पवार यांनी केली. त्यालाही एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. ‘वर्षा’ निवासस्थानाचे दरवाजे आता सर्वसामान्यांसाठी उघडले आहेत. दररोज हजारो लोक तिथे येतात. येणार्‍यांना चहापान देणे ही आपली संस्कृती आहे. ‘वर्षा’वर आल्यानंतर लोकांना चहा-पाणी द्यायचे नाही का? आम्ही त्यांना काही बिर्याणी खाऊ घालत नाही. अजित पवार यांनी चहा-पाण्याचा हिशेब काढला; मग आम्हाला सांगा तुम्ही 70 हजार कोटी सिंचनासाठी पाण्यात घातले. तरीही शून्य पॉईंट एक टक्का जमीनही सिंचनाखाली आली नाही. हे मी म्हणत नाही, तर पृथ्वीराज चव्हाण आणि ‘कॅग’नेच म्हटले आहे. शेवटी त्याचाही हिशेब द्यावा लागेल, असा इशारा देताना कुठे घसरता याचा विचार करा? असे शिंदे यांनी सुनावले.

सात महिन्यांत महिन्याला चाळीस लाखांचा खर्च झाला म्हणता; पण ज्यावेळी फेसबुक लाईव्ह सुरू होते, तेव्हाही ‘वर्षा’ बंगल्याचा महिन्याचा खर्च तीस ते पस्तीस लाख होता. ही माहितीदेखील अजित पवारांनी घ्यायला हवी होती. आम्ही तर प्रत्यक्ष फिल्डवर काम करत आहोत, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

शेतकर्‍यांना सात महिन्यांत 12 हजार कोटी मदत

आम्ही शेतकर्‍यांना जास्तीची मदत केली आहे. अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारने शेतकर्‍यांना 5 हजार 800 कोटी रुपयांची मदत दिली. आम्ही केवळ सात महिन्यांत 12 हजार कोटी रुपयांची मदत दिली आहे. 22 सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, त्यातून राज्यात 5 लाख हेक्टर सिंचन क्षमता वाढणार आहे. राज्यासह मुंबईत पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणावर खर्च केला जात आहे. मुंबईकरांना सुविधा न देता बँकेत ठेवी ठेवण्यात आल्या. या ठेवी काय चाटायच्या होत्या का? असा सवालही एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना विचारला.

तुम्ही कडकसिंग होतात!

आमचे सरकार आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीनवेळा राज्यात आले ते काही निवडणुका आहेत म्हणून आले नाहीत. केंद्राकडून राज्याला भरभरून मदत दिली जात आहे. रेल्वे प्रकल्पांसाठी राज्याला साडेतेरा हजार कोटी रुपये मिळाले. केंद्रीय नगरविकास खात्यानेही मोठ्या प्रमाणावर निधी दिला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये पायाभूत सुविधांवर दहा लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, त्यातील मोठा निधी राज्याला मिळणार आहे. महाविकास आघाडीच्या काळात केंद्राकडून अशी मदत का आली नाही? असा सवाल करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुम्ही तर कडकसिंग होतात, तुम्हाला मदत कशी मिळणार? असा टोला लगावला.

शपथ घेऊन मागे फिरलो नाही

तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि दुसर्‍याच दिवशी पुन्हा राष्ट्रवादीत गेलात. तुमच्यासारखा शपथ घेऊन मागे फिरणारा मी नाही. दिलेला शब्द पाळतो म्हणूनच राजकारणात माझी किंमत आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांना सुनावले.

आज अजित पवार हे विरोधी पक्षांच्या नेत्यांना त्रास दिला जात असल्याची भाषा करीत आहेत. सत्ता असताना राणा दाम्पत्य, केतकी चितळे यांना कोणी आत टाकले, कंगना राणावतच्या घरावर कारवाई कोणी केली? असा सवाल करतानाच नारायण राणे यांना तर जेवणावरून उठवून अटक केली होती, याची आठवण एकनाथ शिंदे यांनी पवार यांना करून दिली. विद्यमान ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांना गुन्ह्यात अडकवण्याचा कट रचण्यात आला होता. मी त्यावेळी महाविकास आघाडीतच मंत्री असल्यामुळे मला सर्व गोष्टी माहीत आहेत; पण मी अधिक बोलणार नाही, असे सांगतानाच महाजन यांना अडकविण्याआधीच मी सरकार बदलले, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

Back to top button