समोशात निरोध, पानमसाला, दगड! पुण्यात कंपनीचे कंत्राट न मिळाल्याने किळसवाणे कृत्य

समोशात निरोध, पानमसाला, दगड! पुण्यात कंपनीचे कंत्राट न मिळाल्याने किळसवाणे कृत्य

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : कंपनीत सामोसे पुरविण्याचे काम दुसऱ्या कंत्राटदाराला मिळाल्याने पहिल्या कंत्राटदाराने षडयंत्र रचून आपले काही कामगार दुसऱ्या कंत्राटदाराकडे कामाला पाठविले. त्यांच्या माध्यमातून कंपनीला पुरविण्यात येणाऱ्या समोशामध्ये निरोध, विमल पानमसाला आणि दगड टाकल्याचे किळसवाणे कृत्य केले. हा प्रकार २७ मार्च रोजी चिखली येथे उघडकीस आला आहे.

याप्रकरणी फिरोज शेख उर्फ मंटू याला अटक करण्यात आली असून त्याच्यासह एसआरएस इंटरप्रायझेसचा मालक रहीम शेख, अझर शेख, मझर शेख, विकी शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कॅटॅलीस्ट सर्व्हिस सोल्युशन्स पार्टनर्स प्रा.ली कंपनीचे सहायक महाव्यवस्थापक कीर्तिकुमार शंकरराव देसाई (वय ३६) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या कॅन्टीनमध्ये खाद्य पदार्थ पुरविण्याचे कंत्राट फिर्यादी देसाई यांच्या कंपनीला मिळाले आहे. देसाई यांची कंपनी पूर्वी मोरवाडी येथील मे. एसआरएस एंटरप्रायझेस या उपकंपनीकडून सामोसा घेत असे. याबाबत त्यांनी करार देखील केला होता. मात्र, एसआरएस एंटरप्रायझेसने पुरवलेल्या एका सामोसामध्ये प्रथमोपचार पट्टी मिळून आली. त्यामुळे देसाई यांनी त्यांच्या सोबतचा करार रद्द केला. त्यानंतर देसाई यांच्या कॅटॅलीस्ट सर्व्हिस सोल्युशन्स पार्टनर्स या कंपनीने सामोसा पुरविण्यासाठी मे. मनोहर एंटरप्रायझेस या कंपनीसोबत करार केला. देसाई यांच्या कंपनीची प्रतिष्ठा मलीन व्हावी, तसेच त्यांचा प्रतिष्ठित कंपनीतील करार रद्द व्हावा, यासाठी एसआरएसचे मालक रहीम शेख, अझर शेख आणि मझर शेख यांनी त्यांचे कामगार फिरोज आणि विकी यांना मनोहर एंटरप्रायझेस येथील कारखान्यात कामासाठी पाठवले. एसआरएसच्या रहीम, अझर आणि मझर यांच्या सांगण्यावरून कामगार फिरोज आणि विकी यांनी काही सामोशांमध्ये निरोध टाकला. तर काही सामोशामध्ये दगड, विमल पान मसाला तंबाखूजन्य पदार्थ भरले. हा किळसवाणा प्रकार उघडकीस आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास चिखली पोलिस करीत आहेत.

कंपनीच्या मॅनेजमेन्टने घेतला शोध

सामोशामध्ये निरोध आणि पानमसाला आढळून आल्यानंतर कंपनी मॅनेजमेन्टने आपल्या पातळीवर या घटनेचा शोध घेण्यास सुरूवात केली. त्या वेळेस नवीन कंत्राटदाराकडे नव्याने कोणी कामाला आले आहे का, याची चौकशी करण्यात आली. तेंव्हा आरोपी आणि इतर काही लोक नव्याने कामाला आले असून ते पहिल्या कंत्राटदाराचे नातेवाईक असल्याचे समोर आले. त्यामुळे संशय बळावल्याने कंपनीने थेट या लोकांविरोधात पोलिसांमध्ये धाव घेतली. पोलिसांसमोर आरोपींनी आपण पहिल्या कंत्राटदाराच्या सांगण्यावरून हा प्रकार केल्याची कबुली दिली.

कंपनीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली. कंत्राटदाराकडे नव्याने कामाला आलेल्या माणसांची चौकशी असता त्यातील आरोपींनी गुन्हा कबूल केला आहे. पहिल्या कंत्राटदाराच्या सांगण्यावरून गुन्हा केल्याचे आरोपींनी सांगितले.
– नकूल न्यामणे, सहायक पोलिस निरिक्षक, चिखली

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news