भंडारा : संतापजनक घटना! गतिमंद तरुणीवर अतिप्रसंग, नराधमास अटक | पुढारी

भंडारा : संतापजनक घटना! गतिमंद तरुणीवर अतिप्रसंग, नराधमास अटक

भंडारा : पुढारी वृत्तसेवा – जिल्ह्यातील सिहोरा पोलिस स्टेशन हद्दीतील २३ वर्षीय गतिमंद तरुणीवर अतिप्रसंग झाल्याची घटना समोर आली आहे. नराधमाने चॉकलेट आणि बिस्कीटचे आमिष दाखवून मागील सहा महिन्यापासून अनैतिक संबंध ठेवल्याने सदर तरुणी पाच महिन्याची गर्भवती असल्याचे उघडकीस आले. पिडीत मुलीच्या आईच्या तक्रारीवरून सिहोरा पोलिस ठाण्यात आरोपी गोपीचंद बिरजलाल नेवारे (वय ५५, रा. सिलेगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात साथ दिल्याप्रकरणी सुलका शेंद्रे (वय ४८, रा. सिलेगाव) या महिलेविरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

६ एप्रिल २०२४ ला ११ वाजण्याच्या सुमारास गतीमंद मुलगी (वय २३) हिला मागील काही दिवसापासून पोटात दुखत असल्यामुळे तिच्या आईने तिला ग्रामीण रुग्णालय सिहोरा येथे वैद्यकीय तपासणीकरीता आणले. तेव्हा डॉक्टरांनी तपासणी करुन ती अंदाजे ४ ते ५ महिण्याची गर्भवती असल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादी आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारपुस केली. तेव्हा तिने सांगितले की, मागील ऑक्टोबर महिन्यापासून घराशेजारील राहणारी सुलका शेंद्रे हिने चॉकलेट व बिस्कीट देऊन गावात राहणारा गोपीचंद बिरजलाल नेवारे याच्यासोबत तिच्या घरी अनेकदा तिच्या इच्छेविरुध्द शारीरिक संबंध ठेवले.

मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन कलम ३७६ (२), (जे) (एल) (एन), ३४ भादंवि कलमान्वये सिहोरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सिहोरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन मदनकर, तिलक चौधरी हे करीत आहेत.

Back to top button