पाणी जपून वापरा अन्यथा टंचाईचे संकट

पाणी जपून वापरा अन्यथा टंचाईचे संकट

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  महापालिकेने खडकवासला धरणातील पाणी वापर आत्तापासूनच कमी करावा अन्यथा जून- जुलैअखेरीस पिण्यासाठी कमी पाणीसाठा उपलब्ध राहून उन्हाळ्याच्या अखेरीस पाणी टंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागेल, असा इशारा पाटबंधारे विभागाकडून महापालिकेला देण्यात आला आहे. त्यामुळे पाणी बचतीसाठी महापालिका पाणी कपात करणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. पुणे शहरासाठी महापालिकेला खडकवासला धरण साखळीतून 11.60 टीएमसी, भामा आसखेड धरणातून 2. 67 टीएमसी आणि पवना 0. 14 टीएमसी असा एकूण 14. 61 इतका वार्षिक पाणीसाठा मंजूर आहे.

संबंधित बातम्या :

मात्र, महापालिका सद्य:स्थितीला दररोज 1567 एमएलडी इतका पाणीसाठा वापरत आहे. या पाणी वापराच्या प्रमाणानुसार वर्षाला 20.20 टीएमसी इतका पाणीसाठा वापरला जाणार असल्याचे पाटबंधारे विभागाचे सहायक अधीक्षक अभियंता रा. वि. सावंत यांनी याबाबत महापालिकेला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. यासंदर्भात ऑक्टोबर महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत महापालिकेने पाण्याचा वापर कमी करावा, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. प्रत्यक्षात मात्र पालिकेचा पाणी वापर कमी झालेला नाही.

तसेच महापालिकेला भामा आसखेड धरणातून जो पाणी कोटा मंजूर झाला आहे, तेवढ्या प्रमाणात खडकवासला धरणातून पाणीपुरवठा कमी करणे बंधनकारक आहे, त्याची अंमलबजावणी अद्याप महापालिकेने केलेली नाही. तसेच कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्यानुसार शेतीला सिंचनासाठी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे धरण साखळीत उन्हाळाअखेरीस पिण्यासाठी कमी पाणी साठा उपलब्ध राहणार आहे. परिणामी शहरात उन्हाळाअखेरीस पाणीटंचाई भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने खडकवासला धरणातील पाणी वापर कमी आणि नियंत्रित करावा, असे पाटबंधारे विभागाने महापालिकेला नुकतेच कळविले आहे.

…तर पाणी कपातीशिवाय पर्याय नाही
पाटबंधारे विभागाने दिलेल्या निर्देशानुसार, महापालिकेने पाण्याचा वापर कमी करण्याचा निर्णय घेतल्यास पाणी कपात करण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. मात्र, आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी मंडळी पुणेकरांवर पाणी कपात लादणार का असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news