आज छत्री घेऊनच बाहेर पडा ! राज्यातील 22 जिल्ह्यांना यलो अलर्ट | पुढारी

आज छत्री घेऊनच बाहेर पडा ! राज्यातील 22 जिल्ह्यांना यलो अलर्ट

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मुंबईसह पुणे, ठाणे भागात रविवारी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. तसेच राज्यातील बहुतांश भागात हलका ते मध्यम पाऊस झाला. सोमवारी विदर्भ, मराठवाड्यात जोर राहणार असून राज्यातील 22 जिल्ह्यांना यलो अलर्टचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात मंगळवार (28 नोव्हेंबर)पर्यंत पाऊस राहणार आहे. सोमवार ते बुधवारपर्यंत राज्यातील बहुतांश जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता असून यामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, वाशिम, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, जळगाव या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. नंदुरबार, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नगर, जालना, बुलढाणा, बीड, धाराशिव, सोलापूर, पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पण वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पाकिस्तानातून आलेला पश्चिमी चक्रवात आता पश्जिम राजस्थानवर आहे. पूर्वेकडील हवेचा वरचा कुंड नैर्ऋत्य अरबी समुद्रापासून ईशान्य अरबी समुद्रापर्यंत आहे. अरबी समुद्र आणि लगतच्या सौराष्ट्र आणि कच्छ किनार्‍यावर कमी दाबाचा पट्टा कायम आहे. अशा वातावरणामुळे सोमवार ते बुधवारपर्यंत अनेक ठिकाणी गडगडाटी वादळ आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडेल. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात लक्षणीय घट होईल. त्यानंतर 27 ते 28 रोजी गुजरात राज्य, आग्नेय राजस्थान, नैऋत्य मध्य प्रदेश, या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा भागात 27 पर्यंत पाऊस राहील तर विदर्भात 28 पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

यवतमाळ 13 अंशावर
अवकाळी पावसाने राज्यातील बहुतांश शहराचे किमान तापमान घटले असून रविवारी यवमाळचा पारा 13 अंशावर खाली आला होता. प्रामुख्याने विदर्भात गोंदिया 13.9, नागपूर 16 अंश इतके किमान तापमान नोंदवले गेले. मात्र ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ झाली होती.

रविवारचे किमान तापमान
यवतमाळ 13, गोंदिया 13.9, अकोला 19, अमरावती 17, नागपूर 16, चंद्रपूर 16, मुंबई 22, पुणे 21, नगर 20.5, जळगाव 20.5, कोल्हापूर 21.6, महाबळेश्वर 16.2, नाशिक 20.4, सांगली 22, सातारा 18.1, सोलापूर 21.6, धाराशिव 21, छत्रपती संभाजीनगर 21.2, परभणी 20.1, नांदेड 21, बीड 19.

Back to top button