पुढारी ऑनलाईन : अमेरिकेतील बँकिंग संकट आणखी गडद झाले आहे. सिलिकॉन व्हॅली आणि सिग्नेचर बँकेनंतर आता आणखी एक बँक दिवाळखोरीत निघाली आहे. अमेरिकेतील फर्स्ट रिपब्लिक बँकेची (First Republic Bank) आर्थिक स्थिती डबघाईला आल्याने या बँकेची आता विक्री होत आहे. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, JPMorgan Chase & Co कंपनी फर्स्ट रिपब्लिक बँक विकत घेईल. आर्थिक संकटात सापडलेली ही बँक नियामकांनी ताबा घेतली होती. ही बँक वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न अयशस्वी झाले होते. आता ही बँक जेपी मॉर्गन चेस अँड कंपनी फर्स्ट रिपब्लिक बँकेचे अधिग्रहण करणार आहे. अमेरिकेतील फर्स्ट रिपब्लिक बँक ही गेल्या दोन महिन्यांत दिवाळखोरीत निघालेली तिसरी बँक आहे.
फर्स्ट रिपब्लिक बँक ही एक व्यावसायिक बँक असून सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया येथे बँकेचे मुख्यालय आहे. (US banking crisis) "जेपी मॉर्गन कंपनी (jpmorgan) फर्स्ट रिपब्लिकच्या सर्व ठेवी आणि सर्व मालमत्ता ताब्यात घेईल", असे कॅलिफोर्निया डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल प्रोटेक्शन अँड इनोव्हेशनने एका निवेदनात म्हटले आहे.
फर्स्ट रिपब्लिक बँकेची ८ राज्यांतील ८४ कार्यालये आता JPMorgan चेस बँकेच्या शाखा म्हणून पुन्हा खुली होतील. तसेच सर्व फर्स्ट रिपब्लिक बँकेचे ठेवीदार जेपी मॉर्गन चेस बँक, नॅशनल असोसिएशनचे ठेवीदार बनतील. फर्स्ट रिपब्लिक बँकेची १९८५ मध्ये स्थापना करण्यात आली होती. चेअरमन जिम हर्बर्ट यांनी १० पेक्षा कमी लोकांना घेऊन या बँकेची सुरुवात केली होती. जुलै २०२० पर्यंत ही बँक अमेरिकेतील बँकांच्या यादीत १४ व्या क्रमांकावर होती. या बँकेत ७,२०० पेक्षा कर्मचारी काम करतात.
याआधी अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँकेची विक्री झाली होती. ही बँक फर्स्ट सिटिझन्स बँकने खरेदी केली आहे. अमेरिकेत व्यापाच्या बाबतीत १६ वी सर्वात मोठी बँक म्हणून ओळख असलेल्या सिलिकॉन व्हॅली बँकेला टाळे ठोकण्याचे आदेश कॅलिफोर्नियातील डीएफपीआय (डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल प्रोटेक्शन अँड इनोव्हेशन) या नियामक प्राधिकरणाकडून देण्यात आले होते. बँकेची मूळ कंपनी असलेल्या एसव्हीबी फायनान्शियल ग्रुपचे समभाग ९ मार्च रोजी जवळपास ६० टक्क्यांनी घसरल्यानंतर बँक बुडीत निघाली होती. अमेरिकेवर याआधीही २००८ मध्ये मोठे आर्थिक संकट ओढवले होते. त्यानंतर अमेरिकेच्या इतिहासातील आर्थिक पडझडीची ही सर्वात मोठी घटना मानली जात आहे.
हे ही वाचा :