पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशातील मेरठमधील एक वेगळीच प्रेम कहाणी समोर आली आहे. ही घटना ऐकून पोलिसही चक्रावले आहेत. अजय नावाच्या एका तरुणाचा खून झाल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतले. प्रियकर आणि पतीसोबत अजय नावाच्या तरुणाची हत्या केल्याची कबुली या महिलेने दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या खूनात सहभागी असणार्या महिलेच्या पतीने आठवड्यापूर्वी आत्महत्या केली आहे.
महिला आणि अजय यांचे प्रेमसंबंध हाेते. महिलेने अजयला मेरठला बोलावून घेवून त्याची हत्या केली. अजयच्या नातेवाईकांनी तक्रार केल्यानंतर २० दिवसांनी मुझफ्फरनगर पोलिसांनी महिलेला अटक करुन चौकशी केली. यानंतर या घटनेचा उलगडा झाला. दौराला पोलिस स्टेशन हद्दीतील अखितरपूर-सिमौली रस्त्यावरील कोरड्या काली नदीत खड्डा खोदून तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेत महिलेच्या आणखी एका प्रियकराचाही सहभाग होता. धक्कादायक बाब म्हणजे, या खूनात सहभागी असणार्या महिलेच्या पतीने आठवड्यापूर्वी आत्महत्या केली आहे.
मुझफ्फरनगर येथील चरथावल पोलिस हद्दीतून दधेडू कला गावातील अजय हा तरुण १३ नोव्हेंबरपासून बेपत्ता झाला होता. नातेवाईकांना त्याचा शाेध घेतला; पण तो सापडला नाही. यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. नातेवाईकांनी अजयच्या शेजारी राहणारा ब्रिजपाल उर्फ बिरजू आणि त्याची पत्नी सविता यांच्यावर संशय व्यक्त केला.
आरोपी बिरजू आणि त्याची पत्नी सविता यांचे कुटुंब मेरठच्या अख्तियारपूरमधील नानिहालमध्ये गेल्या दोन दशकांपासून राहत होते. महिलेचा मेहुणा असे दोन भाऊ दधेडू मध्ये राहतात. ती महिला पतीसोबत गावी ये-जा करत असे. सुमारे दोन-तीन वर्षांपूर्वी या महिलेचे गावी येत असताना शेजारील दधेडू येथील अजय या तरुणाशी प्रेम संबंध जुळले हाेते.
पोलिसांनी बेपत्ता अजयच्या मोबाईलचा सीडीआर काढला. त्याचे शेवटचे लोकेशन दौराला येथे असल्याचे स्पष्ट झाले. मुझफ्फरनगरमधील एएसपी कृष्ण कुमार विश्नोई यांनी एक पथक मेरठला पाठवले. मुझफ्फरनगर पोलिसांनी सविताला अटक केली. तिने पाेलिसांना सांगितले की, तिचे अजयसोबत प्रेमसंबंध होते. तिला नाते तोडायचे होते; पण अजयने तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. महिलेने हा प्रकार पतीला सांगितला. त्यानंतर दोघांनी मिळून त्याची हत्या करण्याचा कट रचला. अजयला महिलेने मुख्तियारपूर गावात बोलावले. मुख्तियारपूर-सिमौली गाव रस्त्यावरील काली नदीत या जोडप्याने खून करून नंतर मृतदेह खड्ड्यात पुरला. महिलेच्या सांगण्यावरून मुझफ्फरनगर पोलिसांनी शनिवारी अजयचा मृतदेह ताब्यात घेतला.
अजयच्या हत्येत सविता आणि तिच्या पतीशिवाय तिचा दुसरा प्रियकर राजबीर याचाही हात असल्याचा पोलिसांचा दावा आहे. राजबीर दुल्हेडा हा पल्लवपुरमचा रहिवासी आहे. त्याचे महिलेशी अनैतिक संबंध होते. महिलेने पती आणि प्रियकरासह मिळून अजयची हत्या केल्याचे पाेलिसांनी म्हटलं आहे.
सविताचा पती बिरजू याने २७ नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली. सविताने सांगितले की, अजयच्या हत्येनंतर बिरजू खूप घाबरला होता. आपण अडकणार असल्याचे तो वारंवार म्हणत होता. पोलिस त्याला अटक करतील. त्यामुळे तो डिप्रेशनमध्ये गेला होता.