एकच प्रवेश परीक्षा! ‘जेईई-नीट’ CUET मध्ये विलीन होणार, UGC चा प्रस्ताव

एकच प्रवेश परीक्षा! ‘जेईई-नीट’ CUET मध्ये विलीन होणार, UGC चा प्रस्ताव

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : अभियांत्रिकी (JEE Main) आणि वैद्यकीय प्रवेश (NEET) परिक्षांबाबत मोठे बदल करण्याची तयारी केली जात आहे. या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी पुढील काळात एकच परीक्षा घेतली जाऊ शकते. विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेशांसाठी एकच कॉमन यूनिवर्सिटी एंट्रेंस टेस्ट-अंडरग्रॅज्युएट (CUET-UG) घेण्याच्या प्रस्तावावर काम करत आहे. याचाच अर्थ असा की दोन्ही अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश परीक्षा CUET-UG मध्ये एकत्रित केल्या जाणार आहेत.

UGC चे अध्यक्ष एम जगदेश कुमार यांनी म्हटले आहे की, या प्रस्तावानुसार गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र या चार विषयांसाठी तीन प्रवेश परीक्षांना बसण्याऐवजी विद्यार्थी एकदाच परीक्षा देऊ शकतात. यासाठी यूजीसी विविध तज्ज्ञांशी विचारविनिमय करण्यासाठी एक समिती तयार करत आहे. आम्ही या सर्व प्रवेश परीक्षांचे एकत्रीकरण करू शकतो जेणेकरुन विद्यार्थ्यांना एकाच ज्ञानाच्या आधारे अनेक प्रवेश परीक्षांना सामोरे जावे लागणार नाही. विद्यार्थ्यांची एकच प्रवेश परीक्षा असली पाहिजे. असा हा प्रस्ताव असल्याचे कुमार यांनी म्हटले आहे.

अभियांत्रिकी प्रवेशासाठी 'Joint Entrance Examination (Main)', वैद्यकीय प्रवेशासाठी 'National Eligibility cum Entrance Test-Undergraduate'आणि आता CUET-UG या देशातील तीन प्रमुख प्रवेश परीक्षा आहेत. या परीक्षांमध्ये सुमारे ४३ लाख विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. यात बहुतांश अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेशासाठी इच्छूक असणारे विद्यार्थी अधिक असतात. विद्यार्थ्यांना जेईई (Mains) साठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणिताची परीक्षा द्यावी लागते. तर NEET-UG मध्ये गणिताऐवजी जीवशास्त्र विषय असतो. हे विषयदेखील CUET-UG च्या ६१ डोमेन विषयांचा भाग आहेत. एकसमान विषयांच्या परीक्षा देत असताना विद्यार्थ्यांना अनेक परीक्षांचा ताण सहन करावा लागू नये. त्यासाठी एकच प्रवेश परीक्षा घेण्याचा यामागचा उद्देश असल्याचे यूजीसीचे म्हणणे आहे.

अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेशासाठी एकच परीक्षा असली तरी गुणांनुसार प्रवेश निश्चित होणार आहे. अभियांत्रिकी प्रवेशासाठी गणित, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र विषयांतील गुण रँकिंगसाठी ग्राह्य मानले जातील. हीच प्रक्रिया वैद्यकीय प्रवेशासाठी असेल, असे यूजीसीकडून सांगण्यात आले आहे.

 हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news