पुणे : ‘तंत्रशिक्षण’चा निकाल योग्यच; पुन्हा परीक्षा घेणार नाही

file photo
file photo

पुणे; पुढारी वृत्तसेवा: 'तंत्रशिक्षण मंडळामार्फत यंदा घेतलेल्या परीक्षांचा निकाल योग्यच आहे. प्रचलित जुन्या परीक्षांबरोबर संबंधित परीक्षेची तुलना केली तर सध्याचा निकाल योग्यच आहे,' असा निर्वाळा मंडळाचे सचिव डॉ. महेंद्र चितलांगे यांनी दिला आहे.
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत यंदा तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांची परीक्षा प्रचलित पध्दतीने घेण्यात आली, परंतु यामध्ये अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याचा आरोप संस्थाचालकांनी केला होता, त्यावर हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. डॉ. चितलांगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिवाळी परीक्षा 2019 नंतर प्रथमच उन्हाळी परीक्षा 2022 ही प्रचलित पध्दतीने घेण्यात आली.

त्यापूर्वी उन्हाळी, हिवाळी परीक्षा 2020, उन्हाळी, हिवाळी परीक्षा 2021 या परीक्षा कोरोनामुळे एमसीक्यू पध्दतीने घेण्यात आल्या. एमसीक्यू पध्दतीने घेण्यात आलेल्या परीक्षेचे स्वरूप हे प्रचलित पध्दतीने घेण्यात येणार्‍या परीक्षेच्या स्वरुपापेक्षा भिन्न होते. त्यामुळे ऑनलाइन परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे उन्हाळी 2022 परीक्षेच्या निकालाची तुलना उन्हाळी परीक्षा 2018 व उन्हाळी परीक्षा 2019 च्या परीक्षेच्या निकालाशी करणे आवश्यक आहे.

त्यामुळे उन्हाळी परीक्षा 2022 चा निकाल कमी प्रमाणात लागला, यामध्ये तथ्य नाही. त्यामुळे उन्हाळी परीक्षा 2022 च्या निकालामध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही. 'या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेण्यात येणार नाही, याची संस्थांनी नोंद घ्यावी. तसेच संस्थेतील विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना याबाबत कळविण्यात यावे. तसेच समाज माध्यमांवरील चिथावणीस, वक्तव्यास बळी न पडण्याबाबत विद्यार्थ्यांचे समुपदेशन करावे,' असे आवाहन डॉ. चितलांगे यांनी केले आहे.

परीक्षांचा तुलनात्मक निकाल
परीक्षा निकाल (टक्केवारी)
उन्हाळी परीक्षा (2018) 36.55
उन्हाळी परीक्षा (2019) 39.45
उन्हाळी परीक्षा (2022) 37.37

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news