Pune Accident News : टँकरच्या धडकेत आई-वडिलांच्या डोळ्यादेखत मुलींचा मृत्यू; पुण्यातील दुर्दैवी घटना

Pune Accident News : टँकरच्या धडकेत आई-वडिलांच्या डोळ्यादेखत मुलींचा मृत्यू; पुण्यातील दुर्दैवी घटना
Published on
Updated on

पुणेः पुढारी वृत्तसेवा : इंधनाची वाहतूक करणार्‍या टँकरने दुचाकीला दिलेल्या धडकेत जुळ्या बहिणींचा जागीच मृत्यू झाला असून, त्यांची आई गंभीर जखमी झाली आहे. ही घटना सोमवारी (दि.16) दुपारी साडेचारच्या सुमारास विश्रांतवाडी चौकात घडली. दोन लहान मुली, पत्नी आणि पती असे चौघे जण मोपेड दुचाकीवरून भोसरीला निघाले होते. त्या वेळी हा अपघात घडला.

साक्षी सतीशकुमार झा, श्रद्धा सतीशकुमार झा (वय – साडेतीन वर्षे) या दोघा जुळ्या बहिणींचा जागीच मृत्यू झाला. तर, किरण सतीशकुमार झा (वय 38, सर्व रा. संत तुकाराम नगर, गोपाळ मंदिराजवळ, भोसरी) या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी, टँकर चालक प्रमोदकुमार यादव याला विश्रांतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झा कुटुंबीय मुळचे बिहारचे आहेत. नोकरीच्या निमित्ताने त्यांचे पुण्यात वास्तव्यास आहेत. सोमवारी ते शास्त्रीनगर येथे दवाखान्यात गेले होते. तेथून दुचाकीवर परत असताना, सतीशकुमार झा, पत्नी किरण आणि दोन जुळ्या मुली साक्षी व श्रद्धा असे चौघे मोपेड दुचाकीवर होते.

सतीशकुमार हे दुचाकी चालवत होते. दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास विश्रांतवाडी चौकात एअरपोर्टकडून भोसरीकडे जाताना, सिग्नल चालू झाल्यानंतर इंधनाची वाहतूक करणार्‍या टँकरने पाठीमागून त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या वेळी सतीशकुमार हे डावीकडे फेकले गेल्याने त्यांचा जीव वाचला. तर, पत्नी आणि दोन्ही जुळ्या टँकरच्या पाठीमागील चाकाखाली आल्या. टँकरचे चाक अंगावरून गेल्यामुळे साक्षी आणि श्रद्धा या दोघींचा जागीच मृत्यू झाला. तर, किरण या गंभीर जखमी झाल्या.

सिग्नल सुटल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत हा भयानक अपघात झाला. अपघात निदर्शनास येताच तेथील नागरिकांनी तत्काळ धाव घेत मुलींनी आणि त्यांच्या आईला दवाखान्यात दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही मुलींचा जागीच मृत्यू झाला होता. ही ह्रदयद्रावक घटना पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले. अपघाताची माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पुण्यात अपघाताचे सत्र सुरूच

दुचाकीवरून जाणार्‍या एकाला डंपरने दिलेल्या धडकेत अपघाती मृत्यू झाल्याची घटना कोंढव्यातील व्ही. व्ही.आयटी कॉलेज येथे 15 ऑक्टोबर रोजी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास घडली. अशोक बसण्णा अस्टगे (मार्केट यार्ड) यांचा अपघातात मृत्यू झाला. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात शरद सनादे (28, रा. प्रेमनगर वसाहत, मार्केट यार्ड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विश्रांतवाडी चौकात साडेचार वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. टँकरने दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये दोन जुळ्या मुलींचा जागीच मृत्यू झाला असून, त्यांची आई गंभीर जखमी आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. टँकरचालकाला पोलिसांनी पकडले असून,पुढील कारवाई सुरू आहे.

– दत्तात्रय भापकर,
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, विश्रांतवाडी.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news