Turkey earthquake | तुर्की, सीरियातील भूकंपबळी ४५ हजारांवर, ९ लाखांहून अधिक लोक झाले बेघर

Turkey earthquake | तुर्की, सीरियातील भूकंपबळी ४५ हजारांवर, ९ लाखांहून अधिक लोक झाले बेघर

इस्तंबूल; पुढारी ऑनलाईन : तुर्की आणि सीरियातील भूकंपबळींचा आकडा ४५ हजारांवर गेला आहे. तुर्की आणि सीरियात झालेल्या ७.८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या शक्तीशाली भूकंपानंतर ११ दिवस उलटले आहे. बचाव पथकातील कर्मचार्‍यांनी नुकतेच ढिगाऱ्याखालून आणखी तीन जणांना बाहेर काढले. या भूकंपामुळे अडीच लाखांहून अधिक इमारती कोसळल्या आहेत. येथे सध्या कडाक्याची थंडी असून अशा परिस्थितीत अजूनही काही लोक कोसळलेल्या इमारतीत अडकून पडले आहेत. दोन्ही देशांत मिळून ९ लाखांहून अधिक लोक बेघर झाले आहेत. (Turkey earthquake)

संयुक्त राष्ट्रसंघाने तुर्कीच्या मदतीसाठी १ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आणि सीरियासाठी ४०० दशलक्ष डॉलर निधीचे आवाहन केले आहे. भूकंपामुळे तुर्की आणि सीरियामध्ये ४५ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर मोठ्या संख्येने लोक जखमी झाले आहेत आणि लाखो लोक हाडे गोठवणाऱ्या थंडीत कसल्याही आश्रयाविना उघड्यावर रहात आहेत. सुमारे ४० भूकंपाच्या धक्क्यांनी सुमारे २ लाख ६४ हजार इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. अनेक लोक अद्याप बेपत्ता आहेत, यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

बांधकाम विकसकांसह १०० हून अधिक संशयितांना ताब्यात घ्या

एक दशकाहून अधिक काळ चाललेल्या नागरी संघर्षामुळे आधीच उद्ध्वस्त झालेल्या शेजारच्या सीरियामध्ये भूकंपामुळे ५,८०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. येथील मृतांच्या आकड्यात वाढ झालेली नाही. तुर्की सरकारने बांधकाम विकसकांसह १०० हून अधिक संशयितांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. कारण निकृष्ट दर्जाच्या इमारतींच्या बांधकामामुळे मोठी जीवितहानी झाली आहे.

जमीन फाटली

गेल्या आठवड्यात सोमवारी झालेल्या प्रलयंकारी भूकंपाने तुर्कीमध्ये प्रचंड भौगोलिक बदल झाले आहेत. द. तुर्कीत सीरियाच्या सीमेनजिक असलेल्या शेकडो एकरच्या ऑलीव्हच्या बागा असलेल्या भूभागात ९८४ फूट रुंद आणि १३० फूट खोल दरी निर्माण झाली आहे. काही किलोमीटरपर्यंत जमीन फाटाल्याचे हे चित्र भयंकर आहे. (Turkey earthquake)

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news