Turkey earthquake : भूकंपामुळे तयार झाली 130 फूट खोल दरी | पुढारी

Turkey earthquake : भूकंपामुळे तयार झाली 130 फूट खोल दरी

इस्तंबूल : वृत्तसंस्था गेल्या आठवड्यात सोमवारी झालेल्या प्रलयंकारी भूकंपाने तुर्कीमध्ये प्रचंड भौगोलिक बदल झाले आहेत. द. तुर्कीत सिरीयाच्या सीमेनजिक असलेल्या शेकडो एकरच्या ऑलीव्हच्या बागा असलेल्या भूभागात 984 फूट रुंद आणि 130 फूट खोल दरी निर्माण झाली आहे. काही किलोमिटरपर्यंत जमीन फाटाल्याचे हे चित्र भयंकर आहे. दरम्यान, भूकंपात मरण पावलेल्यांची संख्या आता 41 हजारांच्या पुढे गेली आहे.

गेल्या आठवड्यात सोमवारी तुर्की आणि सिरीयाच्या सीमेवर आतापर्यंतचा सर्वात भीषण भूकंप झाला. 7.8 क्षमतेच्या या भूकंपाने आतापर्यंत 41 हजार जणांचा बळी घेतला असून लाखो लोक जखमी झाले आहेत. दोन्ही देशांत मिळून 9 लाखांहून अधिक लोक बेघर झाले आहेत. अल्तीनोझू जिल्ह्यात ऑलीव्हच्या हजारो एकरच्या बागा आहेत. या भागात झालेल्या भूकंपाने शब्दश जमीन दुभंगली असून तेथे 984 फूट रुंद व 130 फूट खोल दरी तयार झाली आहे. हिरव्या गार पार्श्वभूमीवर करडया रंगाची ही दरी भूकंपाचे विक्राळ रूप दाखवणारी आहे.

या भागात राहाणार्‍या इरफान अक्सू यांनी सांगितले की, भूकंप झाला तेव्हा प्रचंड स्फोटासारखे आवाज जाणवत होते. कानठळ्या बसवणारा प्रकार होता. सकाळी उजाडल्यावर जे दिसले ते एखाद्या युद्धभूमीसारखे होते. सुदैवाने हा भाग थेट गावाबाहेर असल्याने गावात जमीन दुभंगली नाही. नसता एक हजार घरांचे गाव धरणीच्या पोटात सामावले असते व 7 हजार लोक मरण पावले असते.

जमीन दुभंगली, ऑलीव्हच्या बागाच जमिनीत गडप
दक्षिण तुर्कीतील हजार घरांचे गाव थोडक्यात वाचले
मृतांची संख्या 41 हजारांवर

Back to top button