त्रिपुरात पुन्‍हा भाजप की संत्तातर ? विधानसभा मतदानासा‍ठी प्रशासन सज्ज

त्रिपुरात पुन्‍हा भाजप की संत्तातर ? विधानसभा मतदानासा‍ठी प्रशासन सज्ज

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : एकेकाळी डाव्‍यांचा बालेकिल्‍ला, अशी ओळख त्रिपुरा राज्‍याची  होती. मात्र मागील विधानसभा निवडणुकीत प्रथमच येथील विधानसभेवर भाजपने आपला झेंडा फडकवला. आता भाजप येथील सत्ता अबाधित ठेवणार का, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. राज्‍यातील ६० विधानसभा मतदारसंघांसाठी गुरुवार, १६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, या निवडणुकीचा निकाल ३ मार्च रोजी लागणार आहे. ( Tripura Assembly Election )

त्रिपुरा राज्यात ३,३२८ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. २०.१३ लाख मतदार आपला हक्‍क बजावतील. ६० विधानसभा  मतदारसंघांमध्‍ये २५९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यातील २० महिला आहेत. मतदानासाठी प्रशासन यंत्रणा सज्‍ज झाली असून, राज्‍यात कडेकोट बंदोबस्‍त तैनात करण्‍यात आला आहे.

Tripura Assembly Election : यंदा तिरंगी लढत

सलग २५ वर्ष डाव्‍यांनी त्रिपुरामधील सत्ता अबाधित ठेवली होती. मात्र २०१८ विधानसभा निवडणुकीत भाजपने राज्‍यातील विधानसभेवर झेंडा फडकविला होता. यंदा भाजप आणि काँग्रेस-कम्‍युनिस्‍ट पार्टी ऑफ इंडिया ( एम) आघाडीसह राजेशाही घराण्‍यातील प्रद्योत देववर्मा यांच्या नेतृत्वाखाली टिप्रा मोथा पक्ष निवडणूक रिंगणात आहे. या नव्‍या पक्षाने 'ग्रेटर टिपरलँड' या राज्यातील आदिवासींसाठी स्वतंत्र राज्यासाठी प्रयत्‍न करणार असल्‍याची ग्‍वाही दिली आहे. पश्‍चिम बंगालच्‍या मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्षही आपले नशीब आजमावत आहे.

विधानसभेच्‍या ६० जागांपैकी भाजप ५५ जागा लढत आहे. तर मित्र पक्ष आयपीएफटीला उर्वरीत जागा दिल्‍या आहेत. कम्‍युनिस्‍ट पार्टी ऑफ इंडिया ( एम) ४७ जागा तर काँग्रेस १३ जागांवर लढत आहे. तृणमूल काँग्रेसने २८ मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले आहेत. ६० विधानसभा मतदारसंघांमध्‍ये २५९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यातील २० महिला आहेत. सत्ताधारी भाजपने अन्‍य पक्षांच्‍या तुलनेत सर्वाधिक १२ महिलांना उमेदवारी दिली आहे.

Tripura Assembly Election : प्रद्योत देववर्मा यांचे मोठे आव्‍हान

यंदाच्‍या निवडणुकीत टिप्रा मोथा या नवीन पक्षाने सत्ताधारी भाजपसह काँग्रेस-सीपीआय (एम) आघाडीसमोर मोठे आव्‍हान निर्माण केले आहे. त्रिपुराच्या राजेशाही घराण्‍यातील प्रद्योत देववर्मा हे या पक्षाचे प्रमुख आहेत. आदिवासी समाजाचे नेते, अशी त्‍यांची ओळख झाली आहे. आपणच राज्‍यात किंगमेकर ठरु, असा दावाही ते करत आहेत. विशेष म्‍हणजे २०२१ मध्‍ये झालेल्‍या राज्‍यातील स्‍थानिक स्‍वराज संस्‍थेच्‍या निवडणुकीत टिप्रा मोथा पक्षाला घवघवीत यश मिळाले होते. या पक्षाने ३० पैकी १८ जागा जिंकल्‍या होत्‍या. आता राज्‍यातील विधानसभेच्‍या ६० मतदारसंघांपैकी ३० मतदारसंघ हे आदिवासी बहुल आहेत. टिप्रा मोथा पक्ष राज्‍यात ४२ जागा लढवत आहे. राज्‍यात बांगलादेशातील हिंदू स्‍थलांतरितांमुळे स्‍थानिक लोक आपल्‍याच जन्‍मभूमीत अल्‍पसंख्‍यांक झाल्‍याचा दावा ते करतात. त्‍यांच्‍या या भूमिकेला स्‍थानिकांचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यंदाच्‍या निवडणुकीत त्‍यांनी राष्‍ट्रीय पक्षांसमोर चांगलेच आव्‍हान निर्माण केल्‍याचे राज्‍यातील राजकीय विश्‍लेषक सांगतात.

भाजपसाठी प्रतिष्‍ठेची लढाई, सर्व पक्षांनी उडवला प्रचाराचा धुराळा

त्रिपुरात विधानसभा निवडणुकीच्‍या मागील एक महिन्‍यांहून अधिक काळ प्रचाराची रणधुमाळी उडाली. भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्‍ठेची ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्‍ट्रीय जेपी नड्डा यांच्‍या अनेक केंद्रीय मंत्र्यांनी प्रचारात आपला सहभाग नोंदवला.

माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी आणि ज्येष्ठ नेते प्रकाश करात, वृंदा करात आणि मोहम्मद सलीम यांच्यासह माजी मुख्यमंत्री माणिक सरकार आणि पक्षाचे राज्य सचिव जितेंद्र चौधरी यांनीही जोरदार प्रचार केला. काँग्रेसचे नेते अधीर चौधरी, दीपा दासमुन्शी आणि AICC सरचिटणीस अजय कुमार यांनी विधानसभा  प्रचारात आघाडी घेतली होती. प्रद्योत देववर्मा यांच्‍या टिप्रा मोथा पक्षाने स्‍वबळाचा नारा देत प्रचारात आघाडी घेतली होती. त्रिपुरा मतदानानंतर नागालँड आणि मेघालय या ईशान्‍य भारतातील दोन राज्‍यांमधील विधानसभेसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होईल. यानंतर या तिन्‍ही राज्‍यांचे निकाल ३ मार्च रोजी जाहीर होणार आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news