Thai cave rescue : थायलंडच्या गुहेतून बचावलेल्या ‘त्या’ मुलाचा ब्रिटनमध्ये मृत्यू, फुटबाॅल टीमचा होता कॅप्टन

Thai cave rescue : थायलंडच्या गुहेतून बचावलेल्या ‘त्या’ मुलाचा ब्रिटनमध्ये मृत्यू, फुटबाॅल टीमचा होता कॅप्टन
Published on
Updated on

लंडन; पुढारी ऑनलाईन : थायलंडमध्ये २०१८ मध्ये गुहेतून (Thai cave rescue) १२ मुलांना वाचविण्यात आले होते. या बचावकार्याची जगभरात चर्चा झाली होती. यातील एका १८ वर्षाच्या मुलाचा ब्रिटनमध्ये मृत्यू झाला आहे. दुआंगपेच प्रॉमथेप असे त्याचे नाव आहे. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण त्याच्या डोक्याला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. १७ वर्षांचा असताना त्याने गेल्या वर्षीच्या अखेरीस लिसेस्टरमधील ब्रूक हाऊस कॉलेज फुटबॉल अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला होता. गुहेतून बचावलेल्या त्याच्या काही सहकाऱ्यांनी त्याच्या निधनाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे.

थायलंडमधील स्वयंसेवी संस्था झिको फाउंडेशनने प्रॉमथेपला इंग्लंडमध्ये शिकण्यास शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी मदत केली होती. या संस्थेनेदेखील फेसबुकवर पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला आहे. प्रॉमथेप हा थायलंडमधील मुलांचा समावेश असलेल्या फुटबॉल संघाचा कर्णधार होता. फुटबॉल संघाचे प्रशिक्षक एकापोल चाँटावोंग त्यांच्या १२ विद्यार्थ्यांसह एका प्रॅक्टिस मॅचनंतर कुतुहलापोटी चियांग राय प्रांतातील थाम लुआंग गुहेत गेले होते. थाम लुआंग ही थायलंडमधील सर्वात मोठी गुहा आहे. मुसळधार पावसाने गुहेतील पाण्याचा स्तर वाढला आणि सगळे जण दोन आठवडे गुहेतच अडकले होते. ज्यावेळी ही घटना घडली होती त्यावेळी प्रॉमथेप केवळ १३ वर्षांचा होता. तर त्याचे अन्य सहकारी ११ ते १६ वयोगटातील होते.

थायलंडच्या नौदलाच्या पथकांच्या मदतीने सर्वांची सुटका करण्यात आली होती. या सर्वांना शोधण्यातच चार ते पाच दिवस गेले होते. त्यानंतर त्यांचा शोध लागला होता. त्यानंतर त्यांना बाहेर काढण्याची मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात आली होती. या बचाव मोहिमेत थायलंडच्या नौदलातील एक जवानाचा मृत्यू झाला होता. गुहेतून बाहेर काढलेल्या मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

अनेक दिवस गुहेत राहिल्यामुळे आणि उपासमार झाल्यामुळे ते अशक्त झाले होते. त्यांना कोणत्या रोगाची लागण झाली आहे का, याची तपासणी करण्यात आली होती. रोगाचा प्रसार होण्याचा धोका असल्यामुळे या मुलांना त्यांच्या घरच्यांपासून दूरच ठेवण्यात आले होते. गुहेच्या बाहेर आढळलेल्या सायकलींवरून ते आत अडकल्याचे समजले होते. (Thai cave rescue)

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news