पुढारी ऑनलाईन डेस्क : तिरंगी लढतीमुळे लक्षवेधी ठरलेल्या त्रिपुरा विधानसभा निवडणुकीसाठी आज (दि.१६) ८१ टक्के मतदान झाले. माहिती निवडणूक आयोगाने दिली. राज्यात ३,३२८ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. ६० विधानसभा मतदारसंघांमध्ये २५९ उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले आहे. निवडणूक निकाल २ मार्च रोजी लागणार आहे. मतदानाची अंतिम आकडेवारी शुक्रवारी जाहीर केली जाईल अशी माहिती निवडणूक आयोगाने देण्यात आली आहे. मागील निवडणुकीत म्हणजे २०१८ मध्ये राज्यात विक्रमी ९२ टक्के मतदान झाले होते. (Tripura Election 2023 )
सकाळी मतदान प्रक्रियेला काही तास उरले असताना, त्रिपुरामध्ये तुरळक हिंसाचाराचे प्रकार घडले. भाजपच्या वतीने गैरप्रकार करणारे नागरिकांना मतदानपासून रोखत आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री माणिक सरकार यांनी केला. तर टिप्रा मोथा पक्षाचे प्रमुख प्रद्योत देबबर्मा म्हणाले, "आम्हाला माहिती मिळाली आहे की, भाजपने धनपूर आणि मोहनपूरमध्ये हिंसाचार केला आहे." दरम्यान, यंदा दोन दशकांपूर्वी मिझोराममधून त्रिपुरामध्ये स्थलांतरित झालेल्या ब्रू समुदायाच्या कुटुंबांनी विधानसभा निवडणुकीत प्रथमच मतदान केले. त्रिपुराच्या धलाई जिल्ह्यातील अंबासा विधानसभा मतदारसंघातील हदुक्लापारा मतदान केंद्रावर स्थलांतरितांची मोठी गर्दी झाली होती.
अशी माहिती निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिली. सकाळी सात वाजता राज्यातील ३,३२८ मतदान केंद्रांवर मतदानास प्रारंभ झाला. राज्यभरात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सकाळपासून मतदानाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मतदान केंद्रावर भल्यामोठ्या रांगा लागल्याचे चित्र अनेक ठिकाणी होते. ज्या मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याचे दिसले तेथे तत्काळ मशीन बदलून मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आली. दुपारी एकपर्यंत ५१ टक्के तर दुपारी तीनपर्यंत तब्बल ६९.९ टक्के मतदान झाले. तर चारपर्यंत तब्बल ८१.१० टक्के मतदानाची नोंद झाली होती.
मतदानादिवशी ट्विटच्या माध्यमांतून मतदानाचे आवाहन केल्या प्रकरणी भाजप, काँग्रेस आणि सीपीएमच्या प्रदेशाध्यक्षांना प्रदेशामध्यांना नोटीस बजावण्यात आली. ही कारवाई त्रिपुराच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केली. तिन्ही पक्षांनी शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत याबाबत स्पष्टीकरण द्यावे, असा आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे.
सलग २५ वर्ष डाव्यांनी त्रिपुरामधील सत्ता अबाधित ठेवली होती. मात्र २०१८ विधानसभा निवडणुकीत भाजपने डाव्यांचा पराभव करत प्रथम राज्यातील विधानसभेवर भाजपचा झेंडा फडकविला होता. यंदा भाजप आणि डावे-काँग्रेस आघाडीसह राजेशाही घराण्यातील प्रद्योत देववर्मा यांच्या नेतृत्वाखाली नव्याने स्थापन झालेली टिप्रा मोथा पक्षही निवडणूक रिंगणात आहे. या नव्या पक्षाने 'ग्रेटर टिपरलँड' या राज्यातील आदिवासींसाठी स्वतंत्र राज्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्षही आपले नशीब आजमावत आहे.
विधानसभेच्या ६० जागांपैकी भाजप ५५ जागा लढत आहे. तर मित्र पक्ष आयपीएफटीला उर्वरीत जागा दिल्या आहेत.
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया ( एम) ४७ जागा तर काँग्रेस १३ जागांवर लढत आहे. तृणमूल काँग्रेसने २८ मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले आहेत. ६० विधानसभा मतदारसंघांमध्ये २५९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यातील २० महिला आहेत. सत्ताधारी भाजपने अन्य पक्षांच्या तुलनेत सर्वाधिक १२ महिलंना उमेदवारी दिली आहे.
यंदाच्या निवडणुकीत टिप्रा मोथा या नवीन पक्षाने सत्ताधारी भाजपसह काँग्रेस-सीपीआय ( एम) युतीसमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. त्रिपुराच्या राजेशाही घराण्यातील प्रद्योत देववर्मा हे या पक्षाचे प्रमुख आहेत. आदिवासी समाजाचे नेते अशी त्यांची ओळख झाली आहे. आपणच राज्यात किंगमेकर ठरु, असा दावा ते करत आहेत. विशेष म्हणजे २०२१ मध्ये झालेल्या राज्यातील स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत टिप्रा मोथा यांच्या पक्षाला घवघवीत यश मिळघले होते. त्यांनी ३० पैकी १८ जागा जिंकल्या होत्या. आता राज्यातील विधानसभेच्या ६० मतदारसंघांपैकी ३० मतदारसंघ हे आदिवासी बहुल आहेत. टिप्रा मोथा पक्ष हा ४२ जागा लढवत आहे. राज्यात बांगलादेशातील हिंदू स्थलांतरितांमुळे स्थानिक लोक आपल्याच जन्मभूमीत अल्पसंख्यांक झाले आहेत. त्यांच्या या भूमिकेला स्थानिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे यांनी निर्माण केलेल्या आव्हानाला विरोधी पक्षाला हलक्यात घेवून चालणार नाही, असे राज्यातील राजकीय विश्लेषक स्पष्ट करत आहेत.
त्रिपुरात विधानसभा निवडणुकीच्या मागील एक महिन्यांहून अधिक काळ प्रचाराची रणधुमाळी उडाली. भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भापजचे राष्ट्रीय जेपी नड्डा यांच्या अनेक केंद्रीय मंत्र्यांनी प्रचार केला. माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी आणि ज्येष्ठ नेते प्रकाश करात, वृंदा करात आणि मोहम्मद सलीम यांच्यासह माजी मुख्यमंत्री माणिक सरकार आणि पक्षाचे राज्य सचिव जितेंद्र चौधरी यांनीही जोरदार प्रचार केला. काँग्रेसचे नेते अधीर चौधरी, दीपा दासमुन्शी आणि AICC सरचिटणीस अजय कुमार यांनी प्रचार केला. प्रद्योत देववर्मा यांच्या टिप्रा मोथा पक्षाने स्वबळाचा नारा देत प्रचारात आघाडी घेतली होती. त्रिपुरा मतदानानंतर नागालँड आणि मेघालय या ईशान्य भारतातील दोन राज्यांमधील विधानसभेसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होईल. यानंतर या तिन्ही राज्यांचे निकाल ३ मार्च रोजी जाहीर होणार आहेत.
हेही वाचा :