व्हॉट्सअ‍ॅप बाबत मोठं टेन्शन संपलं, आता एकाच वेळी पाठवता येणार १०० फोटो आणि व्हिडिओ | पुढारी

व्हॉट्सअ‍ॅप बाबत मोठं टेन्शन संपलं, आता एकाच वेळी पाठवता येणार १०० फोटो आणि व्हिडिओ

पुढारी ऑनलाईन: आपल्या वापरकर्त्यांना आनंदी ठेवण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप नेहमी नवनवीन फीचर्सचा प्रयोग करत असते. आता एका नवीन अहवालानुसार, व्हॉट्सअ‍ॅप एक नवीन फीचर आणणार आहे. ज्यामध्ये अँड्राईड वापरकर्त्यांना चॅटमध्ये एकाच वेळी 100 मीडिया फाइल्स पाठवण्याची परवानगी देईल. व्हॉट्स अ‍ॅपच्या या अप्रतिम फीचरबाबत यूजर्समध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. आज आम्ही या लेखात तुम्हाला या नवीन फीचरबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत.

WABetaInfo च्या अहवालानुसार, व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्ते आता त्यांच्या मित्र आणि नातेवाईकांसोबत चॅटमध्ये 100 मीडिया फाइल्स एकाच वेळी शेअर करू शकतील. यापूर्वी चॅटमध्ये केवळ ३० मीडिया फाइल्स शेअर करण्याची सुविधा दिली जात होती. नवीन रोलआउटनंतर त्याची मर्यादा 100 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

सध्याच्या माहितीनुसार, हे फीचर सध्या फक्त ‘Google Play Beta Program’ द्वारे अँड्राईड बीटा टेस्टर्ससाठी आणले आहे. व्हॉट्सअ‍ॅप बीटा व्हर्जन 2.23.4.3 वर अपडेट होताच यूजर्स या नवीन फीचरचा लाभ घेऊ शकतील. तथापि, हे अपडेट iOS च्या बीटा टेस्टर्ससाठी दिले जातील की नाही याबद्दल कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही.

नवीन फिचर किती खास ?

या नवीन फीचरमुळे यूजर्स व्हॉट्सअ‍ॅपवर त्यांच्या मित्र आणि नातेवाईकांसोबत संपूर्ण अल्बम सहज शेअर करू शकतील. तुमच्या खास आठवणी चॅटमध्ये जपून ठेवण्यासाठी हे फीचर उत्तम सुविधा आहे. एवढेच नाही तर मोठ्या मीडिया फाइल्सचा व्यवहार करताना नवीन अपडेट वापरकर्ता एकच फाइल, फोटो किंवा व्हिडिओ दोनदा शेअर करत नाही ना याचीही खात्री करेल.

चॅट हिस्ट्री QR कोडवरून होणार ट्रान्सफर

लवकरच व्हॉट्सअ‍ॅप आपल्या वापरकर्त्यांना क्यूआर कोडद्वारे चॅट हिस्ट्री ट्रान्सफर करण्याची परवानगी देणार आहे. WabetaInfo च्या रिपोर्टनुसार, यूजर्स लवकरच त्यांच्या जुन्या फोनची चॅट हिस्ट्री सहजपणे नवीन फोनमध्ये ट्रान्सफर करू शकतील. यासाठी आता गुगल ड्राइव्हचीही मदत घ्यावी लागणार नाही. नवीन फोनवरील चॅट ट्रान्सफर विभागात जाऊन तुम्ही ते QR कोडमधून सहज ट्रान्सफर करू शकाल.

Back to top button