बंगळूर : पुढारी ऑनलाईन; टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर (Toyota Kirloskar Motor's Vice Chairperson Vikram Kirloskar) यांचे वयाच्या ६४ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आज बुधवारी दुपारी १ वाजता बंगळूर येथील हेब्बल स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कंपनीने लिंक्डइन पोस्टमधून विक्रम किर्लोस्कर यांचे निधन झाल्याची माहिती दिली आहे.
"टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विक्रम एस किर्लोस्कर यांचे २९ नोव्हेंबर २०२२ रोजी निधन झाल्याचे कळवताना आम्हाला अत्यंत दु:ख होत आहे. यावेळी आम्ही प्रत्येकाला त्यांच्या आत्म्याला शांती मिळो अशी प्रार्थना करण्याची विनंती करतो. आम्ही त्यांच्या कुटुंबियांप्रति संवेदना व्यक्त करतो." असे टोयोटा किर्लोस्कर मोटरने पोस्टमध्ये म्हटले आहे.
२५ नोव्हेंबर रोजी मुंबईतील टोयोटा इनोव्हा हायक्रॉसच्या अनावरण कार्यक्रमात किर्लोस्कर उपस्थित होते. ऑटो इंडस्ट्रीतील दिग्गज म्हणून त्यांना ओळखले जात होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी गीतांजली किर्लोस्कर आणि मुलगी मानसी किर्लोस्कर आहेत.
किर्लोस्कर यांच्या निधनाची बातमी कळताच उद्योग जगतातून हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. बायोकॉनचे कार्यकारी अध्यक्ष किरण मुझुमदार शॉ यांनी यांनी म्हटले आहे की माझे प्रिय मित्र विक्रम यांच्या निधनाने मला धक्का बसला आहे. तो माझा इतका प्रिय मित्र होता ज्याची मला खूप आठवण येईल. मी गीतांजली, मानसी आणि त्यांच्या कुटुंबाच्या दु:खात सहभागी आहे.
विक्रम किर्लोस्कर यांनी अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) मधून अभियांत्रिकी पदवी घेतली होती. किर्लोस्कर यांनी १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात जपानच्या टोयोटा मोटर कॉर्पला भारतात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. ते १८८८ मध्ये सुरू झालेल्या किर्लोस्कर समूहाचे चौथ्या पिढीतील सदस्य होते. किर्लोस्कर हे किर्लोस्कर सिस्टम्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आणि टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष होते. किर्लोस्कर समूह मुख्यतः इतर संबंधित उत्पादनांसह पंप, इंजिन आणि कॉम्प्रेसर्सची निर्मिती करतो.
हे ही वाचा :