कोल्हापूर : नॅनो तंत्रज्ञानाधारित सेरोटोनिन सेन्सिंगला भारतीय पेटंट

कोल्हापूर : नॅनो तंत्रज्ञानाधारित सेरोटोनिन सेन्सिंगला भारतीय पेटंट
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्रज्ञांनी मानवी शरीरातील 'आनंददायी मूलद्रव्य' असलेल्या सेरोटोनिन या मूलद्रव्यासाठी नॅनो-संयुगांच्या सहाय्याने सेन्सिंग पद्धत विकसित केली आहे. रसायनशास्त्राच्या क्षेत्रामधील हे एक महत्त्वपूर्ण संशोधन आहे. मानवाच्या विविध मनोविकारांचे निदान व उपचारांमध्ये दूरगामी परिणाम करण्याची क्षमता यात आहे. त्यासाठी नुकतेच भारतीय पेटंट प्राप्त झाले आहे.

रसायनशास्त्र अधिविभागातील डॉ. सागर डेळेकर व संशोधक विद्यार्थी डॉ. साजिद मुल्लाणी यांनी ही कामगिरी केली आहे. डॉ. डेळेकर यांचे या वर्षातील हे सलग दुसरे भारतीय पेटंट आहे. त्यांनी विकसित केलेली ही सेन्सिंग पद्धती सोपी व सुलभ आहे. ही पद्धत विकसित करण्याकरिता अल्प खर्चिक नॅनो संमिश्रांवर आधारित इलेक्ट्रोडचा वापर केला आहे. हे संशोधन 2020 साली रसायनशास्त्रातील प्रतिष्ठित 'सायंटिफिक रिपोर्टस्' या 'नेचर' संशोधन पत्रिकेमध्ये प्रसिद्ध झाले आहे.

संशोधनासाठी स्कॉटलंडमधील (ग्रेट ब्रिटन) संशोधन सहयोगी डॉ. लिन डेन्नी, अमेरिकेतील संशोधक डॉ अन्नदानेश शेल्लेकरी, दक्षिण कोरियातील संशोधक डॉ. नवाज मुल्लाणी यांचेही सहकार्य लाभले.

सध्याच्या धावपळीच्या जगात माणसाचे त्याच्या शारीरिक व मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होते आहे. त्यामधून अनेक आजारांना सामोरे जावे लागते. मानवी शरीरातील 'आनंददायी मूलद्रव्य' मानल्या जाणार्‍या सेरोटोनिनच्या असंतुलनामुळे माणसाला मानसिक ताणतणाव, नैराश्य, चिंता, निद्रेच्या समस्या, पचनाच्या समस्या, आत्मघाती वर्तन, वेड लागणे, आघातानंतरची तणावपूर्ण विकृती, स्किझोफ्रेनिया, फोबिया यासारख्या विविध मनोकायिक समस्यांना सामोरे जावे लागते.

शरीरातील सेरोटोनिन मूलद्रव्याच्या प्रमाणावरच माणसाचे मानसिक स्वास्थ्य अवलंबून असते. परंतु सेरोटोनिनच्या असंतुलनामुळे मानवाच्या बिघडलेल्या मानसिक संतुलनाचे जर प्राथमिक अवस्थेत योग्य निदान झाल्यास त्याची मानसिक परिस्थिती नियंत्रणात आणता येऊ शकते. या निदानासाठी आजघडीला महागड्या वैद्यकीय तपासण्या कराव्या लागतात. यांना पर्याय म्हणून या संशोधनांतर्गत विविध नॅनो संमिश्रांचा वापर करून सुलभ व कमी खर्चिक सेरोटोनिन चाचणी पद्धती विकसित करण्यात यश आले आहे. या संशोधनामुळे विविध मानसिक विकारांचे अधिक चांगले व प्रभावी निदान करता येईल. त्याचप्रमाणे योग्य उपचार करण्यास मदत होईल, अशी माहिती डॉ. डेळेकर यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news