हृदयविकार, मधुमेहाच्या उपचारावर गणितीय सिद्धांत , पुण्यातील शास्रज्ञाने जगाला दिले नवे जेनेटिक अल्गोरिदम | पुढारी

हृदयविकार, मधुमेहाच्या उपचारावर गणितीय सिद्धांत , पुण्यातील शास्रज्ञाने जगाला दिले नवे जेनेटिक अल्गोरिदम

आशिष देशमुख  : 

पुणे : पुणे शहरातील तरुण अभियंता व शास्त्रज्ञ सुहास गायकवाड यांनी हृदयविकार व मधुमेहाच्या वैद्यकीय चाचण्यांवर गणितीय सिद्धांत मांडून उपचार पद्धतीत जगाला नवे अल्गोरिदम दिले आहे. त्यामुळे या दोन्ही आजारांवरच्या उपचार पद्धतीला गती मिळाली आहे. हे संशोधन जगभरातील अनेक देशांनी स्वीकारले असून, संयुक्त राष्ट्र संघाने त्यांची निवड जगभरातील विद्यापीठांच्या मूल्यांकन समितीवर केली आहे.

हडपसर भागात मराठी माध्यमात शिकलेल्या सुहास गायकवाड यांचा हा रोमांचक प्रवास आहे. ते संगणक अभियंता आहेत. जगभरातील अनेक देशांतील दिग्गज शास्त्रज्ञांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले आहे. कारण, त्यांनी अभियंता असून, मधुमेह व हृदयविकारावर जे गणितीय सिद्धांत मांडले, हे संशोधन वाचण्यासाठी किमान 40 डॉलर भरावे लागतात.
सुहास यांचे वय अवघे 35 असून, त्यांनी पुण्यातील मॉडर्न कॉलेजमधून अभियांत्रिकीची पदवी घेतली. सिम्बायोसिस विद्यापीठातून एम.टेक. ही पदव्युत्तर पदवी संपादन केली. नंतर जर्मनीला जाऊन त्यांनी दोन वर्षे एम.एस. केले. त्यानंतर भारतात येऊन खासगी कंपनीत संशोधक म्हणून कामास सुरुवात केली.

जगाने घेतली दखल :

सुहास यांचा हा शोधनिबंध अमिरेकेतील स्प्रिंजर या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाला. याची दखल अमेरिका, युरोप, चीन, जपान या देशांसह संयुक्त राष्ट्र संघानेही घेतली. सुहास सध्या पुण्यातील एका आयटी कंपनीत आहे. त्यांनी ‘अल्गोरिदम फॉर डायबेटिक पेशंट’ हे पुस्तक इंग्रजीत लिहिले असून, ते जगात प्रसिद्ध झाले आहे.

संयुक्त राष्ट्र संघाच्या समितीवर निवड :

सुहास यांना नुकतेच एक पत्र आले आहे. त्यात संयुक्त राष्ट्र संघाने जगातील आठ शास्त्रज्ञांत त्यांची निवड करून एका समितीवर घेतले आहे. ही समिती जगभरातील विद्यापीठांचे मूल्यांकन करून त्यांची श्रेणी ठरविण्याचे काम करणार आहे.

काय आहे संशोधन?

त्यांनी सिस्टीम डायनामिक्सचा आधार घेत मधुमेह आणि हृदयविकाराबाबत प्रत्येकी 10 गणितीय सिद्धांत मांडले. यात हे दोन्ही आजार असणारे रुग्ण, आजार नसणारे रुग्ण आणि किंचित आजाराचा त्रास असणारे रुग्ण, यांचा अभ्यास करून ते सिमुलिंक या सॉफ्टवेअरमध्ये टाकले. यात सुहास यांनी जगाला पहिल्यांदाच सांगितले की, ज्या प्रमाणात शुगर वाढली आहे त्याच प्रमाणात औषधांचा डोस देताना तो कसा ठरवावा. हृदयविकाराबाबतही त्यांनी 12 सिद्धांत मांडले. हृदयातील ब्लॉकेजेस शोधताना त्याचा उपयोग होत आहे. यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) चा उपयोग केला आहे. या दोन्ही आजारांच्या चाचण्यांसाठी काही सॉफ्टवेअर टूल विकसित केले आहेत.

हे संशोधन 2020 सालचे आहे. जर्मनीत असताना या गणितीय सिद्धांताची प्रेरणा मिळाली. तेथे घेतलेल्या उच्चशिक्षणाचा फायदा झाला. माझ्या संशोधनामुळे मधुमेह व हृदयविकाराच्या ट्रिटमेंटमध्ये औषधी डोस देताना फायदा होऊ शकतो, असा दावा केला आहे. आता जगभरातील विद्यापीठांचे मूल्यांकन करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाचे पत्र आले आहे. यात जगभरातील आठ शास्त्रज्ञांत मी एकमेव भारतीय आहे.
                                                               – सुहास गायकवाड, संशोधक, पुणे

Back to top button