नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पुढील आठवड्यात पंढरपूर येथे होणार्या आषाढी एकादशी यात्रेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून जादा बसेसचे नियोजन केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ५ हजार, तर एकट्या नाशिक जिल्ह्यातून तीनशे विशेष बसेस पंढरपूर मार्गावर धावणार आहेत. त्यामुळे पंढरपूर येथे जाणार्या भाविकांची गैरसोय टळणार आहे.
प्रवाशांकडून सुरक्षित प्रवास म्हणून नेहमीच एसटीला प्राधान्य दिले जाते. पंढरपूरची आषाढी यात्रा हा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा जिव्हाळ्याचा विषय असतो. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जाणार्या भाविकांची संख्या जास्त असते. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन २७ जून ते २ जुलै या कालावधीत नाशिक विभागातून २९५ जादा बसेस धावणार आहेत. त्यासाठी सुमारे सहाशे चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी व अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आषाढी यात्रेच्या काळात प्रत्येक आगाराच्या बसस्थानकावर उपाहारगृहे, स्वच्छतागृहे, रुग्णवाहिका, आरोग्य केंद्र, शुद्ध पिण्याच्या पाणी आदी मूलभूत सुविधा एसटी प्रशासनाकडून पुरविण्यात येणार आहेत. नाशिक-पंढरपूर मार्गावर एसटीची दुरुस्ती पथके तैनात असणार आहेत. तर भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रत्येक आगारात यात्रा केंद्र अर्थात बसस्थानके निश्चित करण्यात आली आहेत. त्यामुळे भाविकांनी सुरक्षित प्रवासासाठी एसटी बसेसचा वापर करावा, असे आवाहन एसटी महामंडळ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
लालपरी प्रवाशांच्या दारी
आषाढी एकादशीसाठी गावागावांतून मोठ्या संख्येने भाविक पंढरपूरला जातात. यात्रोत्सवासाठी ४५ प्रवासी असल्यास लालपरी थेट संबंधित गावातून सोडण्यात येणार आहे. त्याबाबत एसटी महामंडळाकडून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना पत्र पाठविण्यात आले आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा :