भोकरदन (जि. जालना) : पुढारी वृत्तसेवा
ट्रक आणि पिकअपच्या भीषण अपघातात तिघे ठार झाले. ही दुर्घटना आज ( दि. २७) सकाळी भोकरदन- जालना रोडवरील बानेगाव पाटीजवळ घडली. मृतांमध्ये सासू-जावयाचा समावेश आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील रामदास रामरतंन पाटील, कल्पनाबाई भरत पाटील, कल्पना गोविंदा ठाकूर, सचिन सुखलाल पाटील आणि भारत पाटील हे कुरडई-पापड विक्रीचा व्यवसाय करतात. मंगळवारी सर्वजण पिकअपमध्ये (क्रमांक एम एच -१९ सी वाय १०९१) जालना येथे निघाले होते. जालना येथे जाण्यासाठी रात्री उशीर झाल्याने भोकरदन तालुक्यातील रिकाम्या जागेत त्यांनी पिकअप गाडी उभी केली.
रात्रभर तिथेच मुक्काम केल्यानंतर सर्वजण सकाळी लवकर जालन्याच्या दिशेने निघाले. सकाळी बाणेगाव पाटीजवळ जालन्याहून येणाऱ्या ट्रकसोबत (क्रमांक एम एच – ४० एके ५१५६) समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला.
यात कल्पनाबाई भरत पाटील (वय ४७), रामदास रामरतंन पाटील (वय ४०) हे जागीच ठार झाले. जालना येथे उपचारासाठी दाखल केलेल्या तीन जखमींपैकी कल्पना गोविंदा ठाकूर (वय ४५) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सचिन सुखलाल पाटील (वय ४०) आणि भारत पाटील (वय ५५) यांच्यावर जालना येथे उपचार सुरू आहेत. सर्वजण जळगाव जिल्ह्यातील अमळनेर दरवाजा मारोती मंदिर एरंडोल येथील रहिवाशी आहेत.
हेही वाचा :