बिबट्या जेरबंद
बिबट्या जेरबंद

चंद्रपूर : दोन चिमुकल्यांना जखमी करणारा बिबट्या जेरबंद

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : मागील महिनाभरापासून भद्रावती येथील आयूध निर्माणी वसाहतीत दहशत माजवून दोन चिमुकल्यांना जखमी करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर वनविभागाला यश आले आहे. रविवारी (दि.९) मध्यरात्रीला लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

गेल्या महिनाभरापासून भद्रावती येथील आयूध निर्माणी वसाहतीत एका बिबट्याने दहशत माजविली होती. चार व दीड वर्षाच्या दोन मुलीवर वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्याने हल्ला करून जखमी केले होते. यामुळे या वसाहतीमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. यानंतर बिबट्याच्या वाढत्या दहशतीची दखल घेवून वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी योजना आखली.

चंद्रपूरचे विभागीय वन अधिकारी खाडे तसेच सहाय्यक वनसंरक्षक चौरे यांच्या सूचनेनुसार भद्रावती वन परिक्षेत्र अधिकारी एच. पी. शेंडे आणि क्षेत्र सहाय्यक विकास शिंदे यांच्या मार्गदर्शनात वसाहतीत पिंजरे लावण्यात आले होते. रविवारी (दि. ९) रोजी रात्री कॅमे-याची पाहणी करण्यासाठी वनविभागाचे अधिकारी गेले असता बिबट्या पिंजऱ्यात बंदिस्त झालेला आढळून आला.

यावेळी बीट अधिकारी गेडाम, सार्ड संस्थेचे सदस्य अनुप येरणे, श्रीपाद बाकरे, अमोल कुचेकर, आशिष चहाकाटे, शैलेश पारेकर, सोनू कूचेकर, प्रणय पतरंगे, इम्रान पठाण, सार्ड सदस्य, वन कर्मचारी व वन मजूर यांनी बिबट्याला पकडण्यासाठी सहकार्य केले. वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या निगराणीत पिंजरा घटनास्थळावरून वनविभागाच्या रोपवाटिकेत सुरक्षित ठेवण्यात आला.

हेही वाचलंत का? 

logo
Pudhari News
pudhari.news