डोंगरीत छोटा शकीलची दहशत | पुढारी

डोंगरीत छोटा शकीलची दहशत

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : कुख्यात मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद ईब्राहीम याचा खास हस्तक शकील बाबू मोईद्दीन शेख उर्फ छोटा शकील याच्या नावाने डोंगरीतील एका व्यावसायिकाला 5 कोटी रुपये आणि जमीनीचा 50 टक्के हिस्सा देण्यासाठी जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. छोटा शकील याच्यासह त्याचा मेहूणा आरिफ अबुबकर शेख उर्फ आरिफ भाईजान आणि बांधकाम व्यावसायिक जयेश शहा विरोधात डोंगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हेशाखा अधिक तपास करत आहे.

डोंगरीतील ई. एम. मर्चंट रोड परिसरातील 45 वर्षीय तक्रारदार व्यावसायिक यांना जमीनींचा व्यापार आणि भागिदारीमध्ये बांधकाम करण्याचा व्यवसाय आहे. त्यांचे चोर बाजार येथे अ‍ॅन्टीक वस्तू विकण्याचे दुकान आहे. ऑगस्ट 2012 मध्ये त्यांनी मिरा रोड, नवघर परिसरात साचे पाच एकर जमीन 4 कोटी रुपयांना विकत घेतली. कुख्यात मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद ईब्राहीम, त्याचे कुटुंबिय, निकटवर्तीय आणि डि गँगशी संबंधीतांकडून होत असलेल्या टेरर फंडिंगबाबत गुन्हा दाखल करुन एनआयए तपास करत आहे. एनआयएने चौकशीअंती आरिफ भाईजान आणि त्याचा भाऊ शब्बीर शेख या दोघांना अटक केली. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील बेकायदेशीर कामात डी गँगचा व्यवहार सांभाळून दहशतवाद पसरवण्यासाठी आर्थिक मदत करत असल्याचा आरोप आरिफ आणि शब्बीर या दोघांवर आहे. यातील आरीफ हा या पूर्वी छोटा शकील याच्या व्यवसायांचा प्रमुख म्हणून काम पाहात होता.

व्यवहार पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांनी तक्रारदार यांना या जमिनीच्या संबंधाने पूर्वीच्या मूळ मालकांनी रवी ग्रुपच्या जयेश शहा आणि त्यांच्या सहकार्‍यांसोबत काही कागदोपत्री व्यवहार केला होता, अशी माहिती त्यांना समजली. चार कोटींची गुंतवणूक केली असल्याने घाबरलेल्या तक्रारदारांनी शहा आणि त्यांच्या सहकार्‍यांशी बोलून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. डिसेंबर 2018 मध्ये मिरा रोडमधील इस्टेट एजेंट श्याम ओझा यांनी त्यांच्याकडे ही जमीन खरेदी करण्यासाठी एक ग्राहक असल्याचे सांगत मिरारोड येथे बोलावले. तक्रारदार हे मिरारोड येथे गेले असता ओझा यांनी आरिफ अबुबकर शेख उर्फ आरिफ भाईजान याच्याशी त्यांची भेट घालून दिली. आरीफ भाईजान हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद ईब्राहीम याचा खास हस्तक छोटा शकीलचा मेहूणा असल्याचे तक्रारदार यांना माहिती होते. आरीफ भाईजान हेच जमीन विकत घेणार असल्याचे ओझा याने तक्रारदार यांना सांगितले. आरिफ भाईजान याने जमिनीचे पेपर्स आपल्याकडे घेतले. त्यानंतर काहीही न बोलता तक्रारदार हे घरी निघून आले. दोन ते तीन दिवसांनी आरीफ भाईजान याने त्त्यांना पुन्हा भेटायला बोलावले.

आरीफ भाईजान याने जागा विकत घेण्यास तयारी दर्शवत रवी ग्रुप म्हणजेच जयेश शहा याच्यासोबत असलेला जमिनीचा वाद मिटवून देण्यासाठी जयेश शहा याला 5 कोटी रोख आणि 50 हजार चौरस फूड विकण्या योग्य जागा देण्यास सांगितले. तक्रारदारांनी घाबरुन स्पष्ट नकार न देता केवळ विचार करुन सांगतो असे सांगितले. त्यावर त्याने आपण छोटा शकील म्हणजेच हाजी साहाबचे काम आपणच बघत असून रवि ग्रुप हा हाजी साहाबचा आहे. जयेश शहा हा हाजी साहाब यांचेच काम सांभाळत आहे. हाजी साहाब यांच्या सांगण्यावरुन हा वाद आपल्याकडूनच मिटवला जाईल असे आरीफ भाईजान याने तक्रारदार यांना धमकावले. तसेच आपली माणसे तुमच्यावर नजर ठेऊन आहेत, असेही सांगितले. त्यानंतर तक्रारदारांनी ओझा यांना हा व्यवहार करण्यास स्पष्ट नकार देत घर गाठले. दोन ते तिन दिवसांनी आरीफ भाईजान याने व्हॉटस् अ‍ॅप कॉल करुन व्यवहाराबाबत विचारणा केली. तक्रारदार यांनी त्याला व्यवहार करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यावर आरीफ भाईजान याने अब गोली से बात करुंगा अशा शब्दांत तक्रारदार आणि त्यांच्या कुटुंबाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. काही दिवसांपूर्वी एनआयएने आरीफ भाईजान आणि त्याचा भाऊ शब्बीर शेख यांना अटक केल्यानंतर तक्रारदारांनी समोर येत मुंबई पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार डोंगरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

एनआयएच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 2019 मध्ये मुंबई गुन्हेशाखेने दाऊद इब्राहिमचा भाचा रिझवान कासकर याला अटक केली होती. दाऊद इब्राहिमला याची माहिती मिळताच तो संतापला. हे कसे होऊ शकते? कुटुंबातील नवीन पिढी पोलिसांनी कशी काय पकडली? असे प्रश्न उपस्थित करत दाऊदने जवळच्या लोकांना फटकारले. त्यानंतर आरिफ याने दाऊदला त्याच्या नेटवर्कद्वारे 2 कोटी रुपये हवे आहेत. तो येथे सर्वकाही व्यवस्थापित करेल. शिवाय रिझवानची सुटका करेल, असे सांगितले. त्यानंतर आरीफला पाकिस्तानमधून टोकन म्हणून 50 लाख रुपये पाठवले गेले. हे पैसे पाकिस्तानमधून गुजरात येथील सुरत आणि तेथून मुंबईत आरिफ याच्याकडे आले. परंतु, आरिफला रिझवान याला सोडवता आले नाही. मात्र त्यावेळपासूनच आरीफ हा पोलिसांच्या आणि तपास यंत्रणांच्या रडारवर आला होता.

Back to top button