Balasahebanchi ShivSena: सर्वात मोठी बातमी! शिंदे गटाने निवडणूक आयोगाला सादर केले चिन्हांचे ‘हे’ तीन पर्याय | पुढारी

Balasahebanchi ShivSena: सर्वात मोठी बातमी! शिंदे गटाने निवडणूक आयोगाला सादर केले चिन्हांचे 'हे' तीन पर्याय

पुढारी ऑनलाईन डेस्क : आत्ताची सर्वात मोठी बातमी ही आहे की, शिंदे गटाने निवडणूक आयोगाला ईमेलद्वारे चिन्हांचे तीन नवी पर्याय सुचवले आहे. शिंदे गटाकडून (Balasahebanchi ShivSena) निवडणूक आयोगाला सूर्य, ढाल- तलवार आणि वडाचे झाड हे पर्याय चिन्हासाठी सादर केले आहेत.

काल सायंकाळी आयोगाने ठाकरे आणि शिंदे गटांसाठी नव्या नावांची आणि फक्त ठाकरे गटाच्या चिन्हाची घोषणा केली होती. यात उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव आणि मशाल हे चिन्ह देण्यात आले आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ (Balasahebanchi ShivSena) हे नाव देण्यात आले आहे. मात्र त्यांना चिन्हाबाबत तीन नवे पर्याय देण्याची सूचना निवडणूक आयोगाकडून करण्यात आली होती. त्यामुळे शिंदे गटाला नवे कोणते चिन्ह मिळणार याबाबत सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

दरम्यान, शिवसेना हे नाव आणि या पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण हे चिन्ह शनिवारी (दि. 8) अंधेरी पोटनिवडणुकी पुरते गोठवल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. त्यामुळे दोन्ही गटांना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्हाचा वापर करता येणार नाही. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना पक्षाची पर्यायी नावे आणि चिन्हे मागितली होती. यानंतर सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत ठाकरे आणि शिंदे गटाने निवडणूक चिन्ह आणि नावे आयोगाकडे पाठवली होती. अखेर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आयोगाने मोठी घोषणा केली. यात मशाल हे चिन्ह ठाकरे गटाला देण्यात आले. मात्र, शिंदे गटाच्या (Balasahebanchi ShivSena) चिन्हाबाबत निर्णय देण्यात आलेला नसून, सध्या शिंदे गटाने पुन्हा नव्याने तीन पर्याय आयोगाला ईमेलद्वारे सादर केले आहेत.

ठाकरे आणि शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे पाठवलेल्या शिवसेनेच्या नवे नाव आणि चिन्हांपैकी दोन पर्याय समान होते. दोन्ही गटांनी त्रिशूल आणि उगवता सुर्य या चिन्हांचा पर्याय ठेवल्याची माहिती मिळाली होती. ठाकरे गटाने त्रिशूल, उगवता सुर्य आणि पेटती मशाल या चिन्हांचे पर्याय ठेवले, तर शिंदे गटाने त्रिशूल, उगवता सुर्य आणि गदा या चिन्हांचे पर्याय दिले होते. अशा स्थितीत दोन्ही गटांकडून त्रिशूळ आणि उगवता सूर्य ही समान चिन्हे झाल्याने आयोगाकडून ठाकरे गटाला पेटती मशाल दिल्याचे समजते आहे. मात्र, शिंदे गटाच्या चिन्हाबाबत अद्याप निर्णय देण्यात आलेला नाही.

Back to top button