Team India Asia Cup : आशिया कप 2018 नंतर भारतीय क्रिकेट संघ किती बदलला आहे?

Team India Asia Cup : आशिया कप 2018 नंतर भारतीय क्रिकेट संघ किती बदलला आहे?

पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India Asia Cup : यंदाची आशिया चषक स्पर्धा ही एकदिवसीय फॉर्मेटमध्ये खेळवली जाणार आहे. 30 ऑगस्टपासून सुरू होणा-या या स्पर्धेची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. याआधी 2018 मध्ये आशिया चषक स्पर्धा 50-50 षटकांच्या स्वरूपात खेळली गेली होती. तेव्हा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली विजेतेपद पटकावण्यात टीम इंडियाला यश आले होते. आता पुन्हा एकदा पाच वर्षांनंतर भारतीय संघ आशिया चषक उंचावण्यास सज्ज झाला आहे.

गेल्या पाच वर्षात संघ किती बदलला? (Team India Asia Cup)

आशिया कप 2018 मध्ये भारतीय संघात 7 फलंदाज होते. यात रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), महेंद्रसिंग धोनी (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, मनीष पांडे, केएल राहुल आणि अंबाती रायडू यांचा समावेश होता. तर केदार जाधव, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांच्या रूपाने 3 अष्टपैलू खेळाडू होते. संघाकडे खलील अहमद, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि शार्दुल ठाकूर यांच्या रूपाने 6 गोलंदाज होते. या खेळाडूंमधील आता धोनी आणि रायुडू यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

'हे' खेळाडू दुखापतीमुळे बाहेर पडले होते

2018 च्या आशिया चषक स्पर्धेपूर्वी भारताचे अनेक खेळाडू दुखापतग्रस्त झाले होते. त्यामुळे ते स्पर्धेतून बाहेर पडले होते. यात हार्दिक पंड्या, अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूर यांचा समावेश होता. निवड समितीने मग त्या तिघांच्या जागी रवींद्र जडेजा, दीपक चहर आणि सिद्धार्थ कौलला संधी दिली होती.

टीम इंडियामध्ये मोठा फरक

2018 चा आशिया चषक संघ आणि 2023 चा संघ यात खूप फरक आहे. 5 वर्षांपूर्वीच्या त्या संघातील फक्त 7 खेळाडू (कुलदीप, रोहित, राहुल, हार्दिक, अक्षर, जसप्रीत आणि शार्दुल) हे यंदाच्या संघात आहेत. तर 11 खेळाडू (धोनी, कार्तिक, मनीष, रायुडू, केदार, खलील, चहल, भुवनेश्वर, शिखर, दीपक आणि सिद्धार्थ) हे निवृत्ती आणि इतर कारणांमुळे संघाचा भाग होऊ शकलेले नाहीत. आशिया चषक 2018 मध्ये धवन संघाचा उपकर्णधार होता आणि विराट कोहलीला त्या स्पर्धेत विश्रांती देण्यात आली होती.

2018 च्या आशिया कपमध्ये 'या' खेळाडूंची चांगली कामगिरी

2018 च्या आशिया चषकमध्ये धवन 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' ठरला होता. त्याने 5 सामन्यात 68.40 च्या सरासरीने 342 धावा केल्या होत्या. त्याने 127 च्या सर्वोत्तम स्कोअरसह 2 शतके झळकावली होती. रोहितने 5 सामन्यात 105.66 च्या सरासरीने 317 धावा केल्या. त्याने 111 धावांच्या सर्वोत्तम धावसंख्येसह 1 शतक आणि 2 अर्धशतके झळकावली. गोलंदाजीत कुलदीपने भारतासाठी 6 डावात सर्वाधिक 10 बळी घेतले होते.

2023 आशिया चषक संघात 30 वर्षांवरील 7 खेळाडू (Team India Asia Cup)

यंदाच्या आशिया चषकात भारतीय संघ हा सर्वात वयस्कर संघ आहे. 7 खेळाडूंचे वय (सूर्यकुमार, रोहित, कोहली, राहुल, जडेजा, मोहम्मद शमी आणि शार्दुल) 30 वर्षांपेक्षा जास्त आहे. संघातील सर्वात तरुण खेळाडू तिलक वर्मा असून तो 20 वर्षांचा आहे. पाकिस्तानच्या संघात 30 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे 4 खेळाडू आहेत. बांगलादेशकडे 30 किंवा त्याहून अधिक वयाचे 2 खेळाडू आहेत. नेपाळचा एकही खेळाडू 30 वर्षांपेक्षा जास्त वयाचा नाही.

भारत एकदिवसीय आशिया चषकाचा 6 वेळा मानकरी

आतापर्यंत 13 आशिया चषक स्पर्धा या एकदिवसीय स्वरूपात खेळल्या गेल्या आहेत. भारताने ही स्पर्धा 6 वेळा (1984, 1988, 1991, 1995, 2010 आणि 2018) जिंकली आहे. तर 2016 मध्ये टीम इंडियाने टी-20 फॉरमॅट आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले होते. त्यामुळे भारतीय संघ हा सर्वाधिक 7 वेळा ही स्पर्धा जिंकणारा संघ आहे. दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंका आहे, ज्यांनी पाचवेळा ट्रॉफीवर कब्जा केला आहे. 2022 साली ही स्पर्धा टी-20 स्वरूपात खेळली गेली होती, ज्याचे विजेतेपद श्रीलंकेने पटकावले होते.

असा आहे 2023 चा भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन (बॅकअप).

आशिया कपचे वेळापत्रक

30 ऑगस्ट : पाकिस्तान विरुद्ध नेपाळ, मुलतान
31 ऑगस्ट : बांगलादेश विरुद्ध श्रीलंका, कँडी
2 सप्टेंबर : भारत विरुद्ध पाकिस्तान, कँडी
3 सप्टेंबर : बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान, लाहोर
4 सप्टेंबर : भारत विरुद्ध नेपाळ, कँडी
5 सप्टेंबर, श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान, लाहोर
फेरी-2 (सुपर-4)
6 सप्टेंबर : A1 वि B2, लाहोर
9 सप्टेंबर : B1 v B2, कोलंबो
10 सप्टेंबर : A1 वि A2, कोलंबो
12 सप्टेंबर : A2 विरुद्ध B1, कोलंबो
14 सप्टेंबर : A1 विरुद्ध B1, कोलंबो
15 सप्टेंबर : A2 v B2, कोलंबो
17 सप्टेंबर : फायनल, कोलंबो

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news