हरमनप्रीत कौर म्हणाली, मला ‘त्या’ घटनेचा पश्चात्ताप नाही | पुढारी

हरमनप्रीत कौर म्हणाली, मला ‘त्या’ घटनेचा पश्चात्ताप नाही

लंडन, वृत्तसंस्था : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरवर सध्या दोन सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे. बांगला देशात अंपायर आणि नंतर बांगला देशी संघासोबत गैरवर्तनप्रकरणी आयसीसीने हरमनप्रीतवर कडक कारवाई करत तिच्यावर दोन आंतरराष्ट्रीय सामन्यांची बंदी घातली. अशा स्थितीत तिला आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीचे सामने खेळता येणार नाहीत. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर भारतीय कर्णधाराने मौन तोडले आहे. हरमनप्रीत कौर म्हणाली की, ढाका येथे बांगला देशविरुद्धच्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात आपला संयम गमावल्याबद्दल मला कोणताही पश्चात्ताप नाही.

ढाकामध्ये अंपायरने तिला आऊट दिल्यानंतर तिने स्टंपवर बॅट मारली होती. नंतर सामना संपल्यानंतरही तिने द्विपक्षीय मालिकेतील अंपायरिंग वाईट असल्याचे सांगितले. तसेच सादरीकरण समारंभात बांगला देशी संघाशी गैरवर्तन केले. यानंतर तिच्यावर बंदी घालण्यात आली.

महिलांच्या ‘द हंड्रेड’दरम्यान एका मुलाखतीत हरमनप्रीत म्हणाली, मला कशाचाही पश्चात्ताप होत आहे, असे मी म्हणणार नाही. कारण, एक खेळाडू म्हणून तुम्हाला योग्य गोष्टी घडत आहेत हे पाहायचे आहे. एक खेळाडू म्हणून, तुम्हाला नेहमी स्वतःला व्यक्त करण्याचा आणि तुम्हाला काय वाटते ते सांगण्याचा अधिकार आहे.

हरमनप्रीत कौर या स्पर्धेत ‘ट्रेंट रॉकेटस्’कडून खेळत आहे. ते म्हणाली, मला वाटत नाही की, मी कोणत्याही खेळाडूला किंवा कोणत्याही व्यक्तीला चुकीचे बोलली आहे. मी फक्त मैदानावर घडलेल्या गोष्टींबद्दल बोलले. मला कशाचीही खंत नाही. बंदीव्यतिरिक्त हरमनप्रीतच्या खात्यात तीन डिमेरिट गुणदेखील जोडले गेले; कारण तिने पंचांच्या निर्णयाशी सहमती दर्शवली नाही. सामना अधिकार्‍यांवर सार्वजनिक टीका करण्यासाठी एक डिमेरिट पॉईंटदेखील जोडला गेला होता.

हेही वाचा…

Back to top button