पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India and ICC event 'पुन्हा एकदा हरलो…' हे वाक्य देशभरातील क्रिकेटप्रेमींसाठी (Cricket ) नेहमीच झालं आहे. ( ICC World Cup 2023 Final) कारणही तसेच आहे कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आयोजित केलेल्या मागील १० वर्षातील १० स्पर्धांमध्ये भारताला विजेतेपदावर मोहर उमटविण्यात अपयश आले आहे. टीम इंडिया (Team India) अन्य क्रिकेट वनडे आणि कसोटी मालिकांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत असताना ICC आयोजित स्पर्धांमध्ये विजयाचा दुष्काळ कायम राहिला आहे. जाणून घेवूया मागील दहा वर्षात या स्पर्धांमधील टीम इंडियाच्या कामगिरी विषयी….
२०१४ मध्ये ICC T-20 विश्वचषक स्पर्धा बांगला देशमध्ये झाली होती. या स्पर्धेत भारताची सुरुवातीपासूनच दमदार कामगिरी केली. साखळी सामन्यात ६ सामन्यांपैकी पाच सामन्यात भारताचा विजय झाला. होता. विशेष म्हणजे उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढ्य संघाचा पराभव करत भारताने अंतिम फेरीत धडक मारली होती. आता टीम इंडिया दुसर्यांदा ICC T-20 विश्वचषक स्पर्धा (टीम इंडियाने २००७ मध्ये T-20 विश्वचषक स्पर्धा जिंकली होती ) जिंकणार असा विश्वास खेळाडूंसह चाहते व्यक्त करत होते. मात्र मीरपूर येथे झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने भारताचा ६ गडी राखून पराभव केला होता. भारतीयांचे पुन्हा एकदा T-20 विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले होते.
२०१५ ICC वन-डे विश्वचषक स्पर्धेचे आयोजन ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांनी संयुक्तपणे केले होते. या स्पर्धेतही भारताची सुरुवात धडाकेबाज झाली. स्पर्धेतील सर्व ६ साखळी सामने जिंकत टीम इंडियाने मोठ्या दिमाखात पुरुषांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्वफेरीत बांगलादेशचा पराभव करत भारताने उपांत्य फेरीत धडक मारली होती. म्हणजे या स्पर्धेतील ८ सामन्यांपैकी ७ सामने जिंकत भारताने उपांत्यफेरीत प्रवेश केला होता. संघाची कामगिरी दमदारपणे सुरु असताना उपांत्य फेरीत पुन्हा खेळाडूंन नांगी टाकली आणि ऑस्ट्रेलियाकडून 95 धावांनी पराभव पत्करावा लागला. या पराभवााने कोट्यवधी क्रिकेटप्रेमींचा पुन्हा हिरमुड झाला. या विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा 7 गडी राखून पराभव करत ऑस्ट्रेलियाने विश्वचषक पटकावला होता.
ICC T-20 2016 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन ८ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत भारतात झाले होते. ही भारतात होणारी पहिली T-20 विश्वचषक स्पर्धा होती. या स्पर्धेत भारताची साखळी सामन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवाने सुरुवात झाली होती. मात्र यानंतर सलग तीन विजयांसह उपांत्य फेरीत धडक मारली होती. मात्र वेस्ट इंडिज संघाने उपांत्य सामन्यात भारताचा ७ विकेट्सने पराभव केला होता. भारतीय फलंदाज विराट कोहलीला या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले.
२०१७ मध्ये ICC चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन इंग्लंड आणि वेल्समध्ये करण्यात आले होते. या स्पर्धेत टीम इंडियाची सुरुवातीपासूनची कामगिरी चॅम्पियन्स सारखीच होती. भारताने साखळी सामन्यात ती विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीत बांगलादेशचा पराभव करत अंतिम सामन्यात धडक मारली होती. मात्र अंतिम सामन्यात पाकिस्ताने प्रथम फलंदाजी करताना ३३८ धावांचा डोंगर रचला. या मोठ्या लक्ष्याचा पाढलाग करताना भारतीय संघ केवळ १५८ धावांवरच आटोपला. तब्बल १८० धावांनी पाकिस्तानने विजय मिळवला. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील अंतिम सामन्यातील पराभव भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी जिव्हारी लागणारा ठरला.
२०१९ मध्ये ICC वन-डे विश्वचषक स्पर्धा ही इंग्लंड आणि वेल्समध्ये आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील १० सामन्यांपैकी ७ सामने भारताने जिंकले होते. दोन सामन्या पराभव झाला होता तर एक अनिर्णित राहिला होता. तरीही उपांत्य फेरीत त्यांना न्यूझीलंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला. या सामन्यात महेंद्रसिंग धोनीचे धावचीत होणे निर्णायक ठरले आणि पुन्हा एकदा भारताचे विश्वविजेता होण्याचे स्वप्न थोडक्यात भंगले होते.
ICC ने २०१९-२१ कसोटी विश्वचषकचे प्रथमच आयोजन केले. जुलै २०१९ मध्ये या स्पर्धेला सुरुवात झाली होती. या स्पर्धेत १२ पैकी ९ कसोटी सामने खेळणार्या देशांचा समावेश होता. प्रत्येक संघ ८ पैकी ६ संघांविरूद्ध मालिका ३ मायदेशी आणि ३ परदेशी मैदानावर खेळल्या. स्पर्धेच्या शेवटी गुणफलकातील अव्वल दोन संघ जेतेपदासाठी इंग्लंडमध्ये अंतिम सामना होणार होता. या स्पर्धेतही टीम इंडियाने धडाकेबाज कामगिरी केली. भारताने पहिल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या क्रमवारीत 17 सामन्यांत 12 विजय मिळवले. न्यूझीलंड विरुद्ध साउथहँप्टन वरील रोझ बोल मैदानावर १८-२२ जून २०२१ दरम्यान अंतिम सामना खेळविण्यात आला. तसेच अंतिम सामन्यासाठी एक राखीव दिवस ठेवण्यात आलेला. अंतिम सामन्यात न्यू झीलंडने भारताचा ८ गडी राखून पराभव केला.
T20 २०२१ विश्वचषक स्पर्धा संयुक्त अरब अमिराती आणि ओमानमध्ये खेळली गेली. वास्तविक ही स्पर्धा २०२० मधीलच हाेती;पण काेराेना संकटामुळे ती लांबली. अखेर भारतातील कोरोना साथीच्या चिंतेमुळे ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये हलविण्यात आली आहे. या स्पर्धेत टीम इंडियाची सुरुवात खराब झाली होती. सलग दोन पराभवांना सामोरे जावे लागले. यातील एक पराभव हा पाकिस्तानविरुद्ध होता. त्यानंतर तीन विजय मिळवूनही टीम इंडियाला उपांत्य फेरी गाठता आली नाही.
२०२२ T20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन ऑस्ट्रेलियात करण्यात आले होते. भारताने ६ सामने जिंकत उपांत्य फेरीत धडक मारली. मात्र उपांत्य सामन्यात इंग्लंडच्या संघाकडून नामुष्कीजनक पराभऐाला सामोरे जावे लागले.
२०२१ -२३ कसोटी विश्वचषक स्पर्धेतील १९ सामन्यांपैकी भारताने १० जिंकले तर ६ सामने गमावले होते. तीन कसोटी सामने अनिर्णित राहिले होते. अव्वल स्थानी झेप घेत भारताने अंतिम सामन्यात धडक मारली. अंतिम सामना लंडन येथे ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात झाला. मात्र भारताने हा अंतिम सामना २०९ धावांनी गमावला आणि पुन्हा एकदा कसोटी विश्वविजेता होण्याचे स्वप्न भंगले.
यंदाची विश्वचषक स्पर्धा नुकतीच भारतात संपन्न झाली. या स्पर्धेतील सलग १० सामने जिंकत भारताने उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्य सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला; पण अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने ६ गडी राखून पराभूत केल्याने भारताची स्वप्नभंगाची मालिका अबाधित राहिली आहे.
ICC स्पर्धेत टीम इंडियाने गेल्या १० वर्षांमध्ये ९३ सामने खेळले. यातील तब्बल ६४ सामने जिंकले आहेत. तर २४ गमावले आहेत. या स्पर्धेतील चार सामने अनिर्णित राखले आहेत. मात्र अंतिम क्षणी सलग १० वर्ष ICC स्पर्धतील विजेतेपद पटकविण्यात भारताचे अपयश कायम राहिले आहे.
हेही वाचा :