ICC WC Team : आयसीसीने निवडला वनडे वर्ल्डकपचा सर्वोत्कृष्ट संघ, रोहित शर्माला बनला कॅप्टन

Rohit Sharma
Rohit Sharma

पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC WC Team : रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया तिसर्‍यांदा वनडे विश्वचषक जिंकण्यात अपयशी ठरली. पण संपूर्ण स्पर्धेदरम्यान त्याने केलेल्या संघ नेतृत्वाने सर्वांनाच प्रभावित केले आहे. त्याच्या निस्वार्थ खेळीला आणि उत्कृष्ट कॅप्टनसीला आयसीसीनेही सलाम केला आहे. रविवारी पार पडलेल्या अंतिम सामन्यानंतर आयसीसीने सोमवारी विश्वचषकाच्या सर्वोत्कृष्ट 12 सदस्यीय संघाची (ICC World Cup Team) घोषणा केली, ज्याचे कर्णधारपद रोहितकडे सोपवण्यात आले आहे.

हिटमॅनने सलग दुसऱ्यांदा स्थान पटकावले (ICC WC Team)

ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा एकदिवसीय विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात कांगारूंनी यजमान भारतीय संघाचा (Team India) 6 गडी राखून पराभव केला. अखेर टीम इंडियाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. दरम्यान, सोमवारी, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) या विश्वचषकासाठी सर्वोत्कृष्ट संघ निवडला असून ज्याचा कर्णधार रोहित शर्माला बनवण्यात आले आहे. हिटमॅनने सलग दुसऱ्यांदा आयसीसी वनडे विश्वचषक संघात स्थान पटकावले आहे. (ICC WC Team)

भारताच्या सहा खेळाडूंची निवड

आयसीच्या वनडे विश्वचषक (ICC ODI WC) संघात 5 देशांचे खेळाडू स्थान मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. यामध्ये भारताच्या सहा, ऑस्ट्रेलिया आणि द. आफ्रिकेच्या दोन खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. तर न्यूझीलंड आणि श्रीलंकेच्या प्रत्येकी एक-एक खेळाडूला या संघात स्थान मिळाले आहे. पाकिस्तान, इंग्लंड, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि नेदरलँड्सच्या एकाही खेळाडूची निवड झालेली नाही. इयान बिशप, के नायडू, शेन वॉटसन (समालोचक), वसीम खान (आयसीसी महाव्यवस्थापक, क्रिकेट) आणि सुनील वैद्य (पत्रकार) या आयसीसीच्या निवड समितीने हा संघ तयार केला आहे. (ICC WC Team)

कोण आहेत इतर भारतीय खेळाडू? (ICC WC Team)

भारतीय खेळाडूंमध्ये रोहितशिवाय विराट कोहली (Virat Kohli), मोहम्मद शमी (Mohammed Shami), जसप्रीत बुमराह(Jasprit Bumrah) , रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि केएल राहुल (KL Rahul) यांचा आयसीसीच्या संघात समावेश झाला आहे. तर ऑस्ट्रेलियाचे ग्लेन मॅक्सवेल आणि अॅडम झाम्पा आपली जागा निश्चित करण्यात यशस्वी ठरले. पण यामध्ये कांगारूंचा कर्णधार पॅट कमिन्स आणि अंतिम सामन्यात दमदार शतक झळकावणाऱ्या ट्रॅव्हिस हेड यांना निवड समितीने डच्चू दिला आहे.

डी कॉक-रोहित सलामीवीर

आयसीसी निवड समितीने रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी सलामीवीर नेमले आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ उपविजेता ठरला आहे. यावेळी हिटमॅनने 54.27 च्या सरासरीने आणि 125.94 च्या स्ट्राइक रेटने 597 धावा केल्या, ज्यामध्ये 1 शतक आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. रोहित हा विश्वचषकाच्या एकाच मोसमात सर्वाधिक धावा करणारा कर्णधार बनला. त्याने केन विल्यमसनचा विक्रम मोडीत काढला. ज्याने 2019 च्या विश्वचषकात 578 धावा केल्या होत्या. दुसरीकडे क्विंटन डी कॉकने उपांत्य फेरीपर्यंत द. आफ्रिकेच्या मोहिमेत कौतुकास्पद कामगिरी केली. या यष्टीरक्षक फलंदाजाने आपला शेवटचा एकदिवसीय विश्वचषक खेळताना 59.40 च्या सरासरीने 594 धावा वसूल केल्या. यादरम्यान त्याने 4 शतके झळकावली. यंदाच्या स्पर्धेत तो सर्वाधिक शतके फटकावणारा खेळाडू ठरला आहे. त्याने यष्टीरक्षक म्हणून 20 फलंदाजांना बाद करण्यात महत्त्वाची भूमीका पार पाडली आहे.

कोहली, मिशेल आणि राहुल

आयसीसीने आपल्या संघात विराट कोहली, डेरिल मिशेल आणि केएल राहुल यांचीही निवड केली आहे. आपल्या बॅटने फटकेबाजी करणारा कोहली या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. त्याने 11 सामन्यात 95.62 च्या सरासरीने आणि 90.31 च्या स्ट्राईक रेटने 765 धावा केल्या, ज्यामध्ये 3 शतकांचाही समावेश आहे. तर मिचेलने 111.06 च्या स्ट्राइक रेटने एकूण 552 धावा (2 शतके) केल्या. केएल राहुलने 90.76 च्या स्ट्राईक रेटने 452 धावा केल्या.

मॅक्सवेल-जडेजाने अष्टपैलू

निकालाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने द्विशतक (नाबाद 201) झळकावले आणि आपल्या संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. त्याने 150.37 च्या स्ट्राईक रेटने एकूण 400 धावा केल्या. तसेच त्याने गोलंदाजीत 6 बळीही मिळवले. दुसरीकडे भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने या विश्वचषकात चांगली गोलंदाजी केली. त्याने 11 सामन्यात 24.87 च्या सरासरीने एकूण 16 विकेट घेतल्या. तर फलंदाजीत त्याने 40.00 च्या सरासरीने 120 धावा केल्या.

शमी, बुमराह वेगवान गोलंदाज

मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, दिलशान मदुशंका आणि अॅडम झम्पा यांनाही आयसीसीच्या वनडे विश्वचषक संघात स्थान मिळाले आहे. शमीने 7 सामने खेळले, ज्यात 10.70 च्या अविश्वसनीय सरासरीने आणि 5.26 च्या इकॉनॉमी रेटने 24 बळी मिळवले. बुमराहने 11 सामन्यात 18.65 च्या सरासरीने आणि 4.06 च्या इकॉनॉमी रेटने 20 विकेट्स पटकावल्या. तर झाम्पाने (11 सामने) आपल्या फिरकीच्या जाळ्यात 23 फलंदाजांना अडकवले. मधुशंकाने 9 सामन्यात 25.00 च्या सरासरीने 21 विकेट घेतल्या.

आयसीसी वनडे विश्वचषक 2023 चा सर्वोत्तम संघ

रोहित शर्मा (कर्णधार-भारत), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर-दक्षिण आफ्रिका), विराट कोहली (भारत), डॅरिल मिशेल (न्यूझीलंड), केएल राहुल (भारत), ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया), रवींद्र जडेजा (भारत), जसप्रीत बुमराह (भारत), दिलशान मदुशंका (श्रीलंका), अॅडम झाम्पा (ऑस्ट्रेलिया), मोहम्मद शमी (भारत), जेराल्ड कोएत्झी (12वा खेळाडू-दक्षिण आफ्रिका)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news