नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह राज्यसभेतील १४ सदस्यांना उपराष्ट्रपती व सभापती जगदीप धनखड यांनी आज (दि. ४) पद व गोपनीयतेची शपथ दिली. सोनिया गांधी यांनी शपथ घेताच त्या गांधी घराण्याच्या इतिहासात राज्यसभेवर जाणाऱ्या पहिल्या सदस्य ठरल्या आहेत. Rajya Sabha
आपल्या २५ वर्षांच्या राजकीय आयुष्यात सोनिया गांधी यांनी संसदेत पोहचण्यासाठी वरिष्ठ सभागृहाचा आधार घेतला नाही. त्या १९९९ मध्ये पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आल्या होत्या. कर्नाटकच्या बेल्लारी आणि उत्तरप्रदेशातील रायबरेली या दोन मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. बेल्लारीमध्ये सोनिया गांधी यांनी भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज यांना पराभूत केले होते. मात्र, त्यानंतर बेल्लारीची जागा सोडून त्या रायबरेलीमधूनच खासदार झाल्या होत्या. आतापर्यंत त्यांनी याच मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. मात्र, आता त्यांनी राजस्थानमधून राज्यसभेचा मार्ग निवडला आहे. Rajya Sabha
सोनिया गांधी यांनी हिंदीतून तर ओडिशातून राज्यसभेवर निवडून आलेले केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी उडीया भाषेतून शपथ घेतली. राज्यसभा सदयत्वाची शपथ घेणाऱ्या इतर १४ खासदारांमध्ये आंध्रप्रदेशातील वायएसआर काँग्रेसचे गोला बाबूराव, मेघा आर. रेड्डी, वाय. व्ही. सुब्बारेड्डी, बिहारमधील जदयूचे संजय कुमार झा, कर्नाटकातील कांग्रेसचे सय्यद नासीर हुसैन, अजय माकन, ओडिशातील बिजदचे सुभाशीष खुंटिया, देवाशीष समंत्रय, भाजपचे मदन राठौड़, तेलंगणमधून टीआरएसचे रवी सी. वी. राजू, उत्तरप्रदेशातील भाजपचे आर.पी.एन सिंह आणि पश्चिम बंगालमधील भाजपचे समीक भट्टाचार्य आदींचा समावेश आहे.
राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर सोनिया गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. यावेळी मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोनिया गांधी यांना शुभेच्छा दिल्या. "काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज राज्यसभेत शपथ घेऊन त्यांच्या नव्या इनिंगला सुरुवात केली.. प्रतिकूल परिस्थिती आणि राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर त्यांचे धैर्य, लवचिकता आमच्या संसदीय धोरणाला मार्गदर्शन करत राहील. त्यांनी लोकसभेत २५ वर्षे केम केले. आता मी आणि माझे सहकारी सदस्य वरिष्ठ सभागृहात त्यांची वाट पाहत आहोत." असे खर्गे म्हणाले. या भेटीच्या वेळी काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी उपस्थित होत्या.
हेही वाचा