सोनिया गांधी बिनविरोध राज्यसभेवर | पुढारी

सोनिया गांधी बिनविरोध राज्यसभेवर

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजस्थानातून राज्यसभेवर पोहोचल्या आहेत. आज त्यांची राज्यसभेच्या खासदारकीसाठी बिनविरोध निवड झाली. सोनिया गांधींसोबतच, भाजपचे चुन्नीलाल गरसिया आणि मदन राठोड हे देखील राजस्थानातून बिनविरोध निवडून आले.

राज्यसभा निवडणुकीसाठी  निर्णय अधिकारी असलेले विधानसभेचे प्रधान सचिव महावीर प्रसाद शर्मा यांनी राजस्थानातून सोनिया गांधींसह तिन्ही उमेदवारांची राज्यसभेच्या निवडणुकीसाठी बिनविरोध निवड झाली आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग राजस्थानमधून राज्यसभेवर निवडून आले होते. त्यांचा कार्यकाळ तसेच भाजपचे नेते भूपेंद्र सिंग राज्यसभेचा कार्यकाळ तीन एप्रिल रोजी संपत आहे. भाजपचे राज्यसभा सदस्य किरोरीलाल मीना यांनी आमदार म्हणून निवडून आल्यानंतर डिसेंबरमध्ये खासदारकीचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर ही निवडणूक झाली.  राज्यसभा निवडणुकीसाठी राजस्थानमध्ये तीन जागांवर चुरशीची लढत अपेक्षित होती. मात्र, अंतिमतः कॉंग्रेसतर्फे वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि भाजपतर्फे चुन्नीलाल गरसिया आणि मदन राठोड  अशा तीन उमेदवारांनीच अर्ज भरल्यामुळे बिनविरोध निवडीची केवळ औपचारिकता उरली होती. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आजची (२० फेब्रुवारी) अंतिम मुदत होती. अखेरीस तिन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे घोषित करण्यात आले.

कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधींनी रायबरेली (उत्तर प्रदेश) या पारंपरिक लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविणार नसल्याचे आधीच जाहीर केले होते. त्या राज्यसभेवर जाणार असल्याने रायबरेलीतून प्रियांका गांधी निवडणूक लढणार अशीही चर्चा रंगली आहे. तर, राहुल गांधी केरळमधील वायनाड येथून लोकसभेची निवडणूक लढविण्याबरोबरच, अमेठी (उत्तरप्रदेश) या पारंपरिक मतदार संघातूनही लढणार असल्याचे कॉंग्रेसमधून सांगितले जात आहे.

Back to top button