IPL 2023 Suryakumar Yadav | सूर्यकुमारनं आयपीएल कारकीर्दीत ३ हजार धावा केल्या पूर्ण

IPL 2023 Suryakumar Yadav | सूर्यकुमारनं आयपीएल कारकीर्दीत ३ हजार धावा केल्या पूर्ण

पुढारी ऑनलाईन डेस्क : सूर्यकुमार यादवच्या ३५ चेंडूंतील ८३ धावांच्या झंझावाती खेळीच्या बळावर मुंबई इंडियन्सने आयपीएल साखळी सामन्यात आरसीबीचा ६ विकेटस् व २१ चेंडूंचा खेळ बाकी राखत एकतर्फी धुव्वा उडवला. इशान किशनची २१ चेंडूंतील ४२ व वधेराची नाबाद ५२ धावांची खेळी समयोचित ठरली. सूर्यकुमार व वधेरा या जोडीने १४० धावांची भागीदारी साकारत मुंबईला सनसनाटी विजय मिळवून दिला. या स्फोटक खेळीसोबतच सूर्यकुमार यादवने आयपीएल कारकिर्दीत ३ हजार धावा पूर्ण केल्या आहेत.

वानखेडे स्टेडियमवरील मंगळवारी झालेल्या लढतीत आरसीबीने २० षटकांत ६ बाद १९९ धावांचा डोंगर रचल्यानंतर मुंबईने देखील तोडीस तोड प्रत्युत्तर देत अवघ्या १६.३ षटकांत ४ गड्यांच्या बदल्यातच विजयाचे लक्ष्य गाठले. या विजयासह मुंबईच्या खात्यावर आता १२ गुण झाले असून त्यांनी गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. प्लेऑफ स्थान निश्चितीसाठी त्यांना आणखी दोन विजयांची गरज असेल. मुंबईच्या या विजयाचा हिरो ठरला सूर्यकुमार यादव; त्याने आपल्या धडाकेबाज फलंदाजीने सर्वांची मने जिंकली. आरसीबीविरुद्ध वेगवान फलंदाजी करणाऱ्या सूर्यकुमारने केवळ ३५ चेंडूत ८३ धावांची खेळी केली. या दमदार फलंदाजीसह त्याने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला.

सूर्यकुमारने IPL मध्ये 3000 धावा केल्या पूर्ण

T20I क्रिकेटचा नंबर एकचा फलंदाज सूर्यकुमार IPL 2023 मध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. आयपीएलच्या या हंगामात आतापर्यंत सूर्याच्या बॅटमधून चार अर्धशतके झाली आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट २०० च्या आसपास आहे. उत्कृष्ट फॉर्ममध्ये धावणाऱ्या सूर्यकुमार यादवने आरसीबीविरुद्ध ८३ धावांची तुफानी खेळी केली. यासह त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीत ३,००० धावांचा टप्पा पार केला. ही कामगिरी करणारा तो २२ वा खेळाडू तर १४ वा भारतीय खेळाडू आहे.

आरसीबीच्या सर्व गोलंदाजांचा इकॉनॉमी रेट १० पेक्षा जास्त

सूर्यकुमार, इशान, वधेराच्या तडाख्यात आरसीबीचे पाचही गोलंदाज सापडले आणि या सर्वांची घटकामागील इकॉनॉमी ११ धावांपेक्षाही अधिक राहिली. ४ षटकात ५३ धावा मोजणाऱ्या हसरंगाची इकॉनॉमी १३.२५ इतकी महागडी ठरली. याशिवाय, विजयकुमार (१२.३३), हर्षल पटेल (११.७१), हॅझलवूड (१०.६६), सिराज (१०.३३) हे सर्व गोलंदाज घटकामागे १० पेक्षा अधिक इकॉनॉमीने महागडेच ठरले!

सूर्यकुमार- वधेराची १०.४ षटकांत १४० धावांची भागीदारी !

मुंबई इंडियन्स आणि आरसीबी सामन्यात रोहित पाचव्या षटकातील शेवटच्या चेंडूवर झेलबाद झाल्यानंतर सूर्यकुमार व वधेरा ही जोडी आरसीबीसाठी अक्षरश: कर्दनकाळ ठरली. अवघ्या १०.४ षटकांत १४० धावांची झंझावाती फटकेबाजी साकारत या जोडीने आरसीबीच्या गोलंदाजांची पुरती लक्तरे काढली. या उभयतांच्या झंझावातासमोर आरसीबीचे २०० धावांचे आव्हानही तोकडे पडले. यात सूर्यकुमारचा स्ट्राइक रेट २३७.१४ तर इशानचा स्ट्राइक रेट देखील २००.०० इतका लक्षवेधी राहिला.

सुर्यकुमारच्या आयपीएलमधील टॉप इंनिंग्ज

८३ (२५) वि. आरसीबी २०२३ *
८२ (४०) वि. हैदराबाद २०२१
७९* (४३) वि. आरसीबी २०२०
७९ * (४७) वि. राजस्थान २०२०

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news