Jofra Archer : मुंबई इंडियन्सला झटका, जोफ्रा आर्चर IPL मधून बाहेर | पुढारी

Jofra Archer : मुंबई इंडियन्सला झटका, जोफ्रा आर्चर IPL मधून बाहेर

पुढारी ऑनलाईन डेस्क : Jofra Archer : आयपीएलमध्ये आज (दि. 9) मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात सामना रंगणार आहे. मात्र, त्याआधीच रोहित सेनेला मोठा झटका बसला आहे. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर फिटनेसच्या समस्येमुळे आयपीएलच्या उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडला आहे. तो त्याच्या मायदेशी परतणार असून तिथे इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या देखरेखीखाली असेल, अशी माहिती फ्रँचायझीने दिली आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सने आर्चरच्या बदलीची घोषणा केली असून इंग्लिश वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डनचा संघात समावेश करण्यात आला आहे.

आर्चर 2021 च्या सुरुवातीपासून दुखापतीने त्रस्त आहे. गेल्या 26 महिन्यांत त्याच्यावर 6 वेळा शस्त्रक्रिया झाल्या आहेत. दुखापती आणि शस्त्रक्रियेतून पूर्णपणे बरा न झाल्याने आर्चरला आता इंग्लंडला परतावे लागणार आहे.

दरम्यान, मुंबई इंडियन्सने आर्चरच्या बदलीची घोषणा केली असून इंग्लिश वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डनचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याला दोन कोटी रुपयांत खरेदी करण्यात आले आहे. जॉर्डन याआधी राजस्थान रॉयल्सकडून गेल्या मोसमात खेळला होता. त्याला यॉर्कर स्पेशालिस्ट मानले जाते तसेच तो डेथ ओव्हर्समध्ये फलंदाजांना वेसण घालण्यात पटाईत आहे. हेच ओळखून मुंबईने त्याला आपल्या संघात सामील करून घेतले होते.

जॉर्डनने 2016 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. आतापर्यंत त्याने 28 सामने खेळले असून 27 विकेट्स त्याच्या नावावर आहेत. याशिवाय त्याने इंग्लंडकडून 87 टी-20 सामने खेळले आजेत. यात त्याने 96 विकेट घेतल्या आहेत. जॉर्डन शेवटच्या टप्प्यात आक्रमक फलंदाजीही करू शकतो.

जोफ्रा आर्चरने यंदाच्या मोसमात मुंबई इंडियन्सकडून केवळ 5 सामने खेळले. पहिल्या सामन्यानंतरच त्याला चार सामन्यांचा ब्रेक घ्यावा लागला. वास्तविक, पहिल्या सामन्यात गोलंदाजी करताना त्याला उजव्या कोपरात काही समस्या निर्माण झाली होती आणि त्यानंतर त्याच्या दुखापतीवर एक छोटीशी शस्त्रक्रिया करावी लागली. ही शस्त्रक्रिया बेल्जियममध्ये करण्यात आली. यानंतर आर्चरने आयपीएल 2023 मध्ये पुनरागमन केले आणि त्यानंतर 5 पैकी चार सामने खेळले.

आर्चरच्या कामगिरीवर त्याच्यावर वारंवार होणाऱ्या दुखापती आणि शस्त्रक्रियांचा परिणाम दिसून आला. त्याला 5 सामन्यात फक्त दोन विकेट घेता आल्या. यादरम्यान त्याने 9.5 प्रति षटकाच्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या.

Back to top button