Dhar Bhojshala ASI survey | भोजशाळा- कमाल मौला मशिदीच्या ASI सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास SC चा नकार

Dhar Bhojshala ASI survey | भोजशाळा- कमाल मौला मशिदीच्या ASI सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास SC चा नकार

पुढारी ऑनलाईन : मध्य प्रदेशातील धार येथील भोजशाळा आणि कमाल मौला मशीद या वादग्रस्त स्थळांच्या पुरातत्व सर्वेक्षणाला (ASI) स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. (Dhar Bhojshala ASI survey) "भोजशाळा आणि कमाल मौला मशिदी"चे सर्वेक्षण करण्याचे निर्देश देणाऱ्या मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्धच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. सर्वेक्षणाच्या निकालाच्या आधारे त्यांच्या परवानगीशिवाय कोणतीही कारवाई करू नये, असे अंतरिम निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. वादग्रस्त जागेवर कोणत्याही प्रकारचे उत्खनन करू नये; ज्यामुळे त्याचे मूळ स्वरूप बदलेल, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

२२ मार्चपासून भोजशाळा संकुलाचे सर्वेक्षण सुरु झाले आहे. धारचे पोलिस अधीक्षक (एसपी) मनोज कुमार सिंह यांनी यापूर्वीच स्‍पष्‍ट केले आहे की, भोजशाळा संकुलामध्‍ये मंगळवारी 'पूजा' आणि शुक्रवारी 'नमाज' होईल.

मध्‍य प्रदेशमधील भोजशाळा आणि कमल मौला मशीद संकुलाचे पुरातत्व सर्वेक्षण करण्‍यास इंदूर उच्‍च न्‍यायालयाच्‍या न्यायमूर्ती सुश्रुत अरविंद धर्माधिकारी आणि देवनारायण मिश्रा यांच्या खंडपीठाने ११ मार्च रोजी परवानगी दिली होती. भोजशाळा संकुलाचे 'वैज्ञानिक सर्वेक्षण' सहा आठवड्यांच्या आत करण्याचे निर्देश दिले होते. ७ एप्रिल २००३ रोजी जारी केलेल्या ASI आदेशानुसार, हिंदूंना दर मंगळवारी भोजशाळा संकुलात पूजा करण्याची परवानगी आहे, तर मुस्लिमांना शुक्रवारी त्या ठिकाणी नमाज अदा करण्याची परवानगी आहे. (Dhar Bhojshala ASI survey)

'भोजशाळा' वाद नेमका काय?

धार येथील भोजशाळेत सरस्वती देवीची मूर्ती बसवण्याची आणि संपूर्ण संकुलाची व्हिडिओग्राफी करण्याची मागणी करणारी याचिका इंदूर उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली हाेती . तसेच येथील नमाज बंद करण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.

इतिहास काय सांगतो?

धार येथे परमार घराण्याची सत्ता होती. राजा भोज यांनी येथे १००० ते १०५५ पर्यंत राज्य केले. राजा भोज हे सरस्वती देवीचे निस्सीम भक्त होते. त्यांनी १०३४ मध्ये येथे एक महाविद्यालय स्थापन केले, जे नंतर 'भोजशाळा' म्हणून ओळखले जाऊ लागले. हिंदूंनीही याला सरस्वती मंदिर मानले. १३०५ मध्ये अलाउद्दीन खिलजीने भोजशाळा उद्‍ध्वस्त केल्याचे सांगितले जाते. यानंतर १४०१ मध्ये, दिलावर खान गौरीने भोजशाळेच्या एका भागात मशीद बांधली. १५१४ मध्ये महमूद शाह खिलजीने दुसऱ्या भागातही मशीद बांधली. १८७५ मध्ये येथे उत्खनन झाल्याचे मानले जाते. या उत्खननात सरस्वती देवीची मूर्ती सापडली.  ब्रिटीश अधिकारी मेजर किनकेड याने ही मूर्ती इंग्‍लंडला नेली. सध्‍या ती लंडनच्या संग्रहालयात आहे. ती परत आणण्याची मागणीही हायकोर्टात दाखल याचिकेत करण्यात आली आहे.

हिंदू संघटना भोजशाळेचे वर्णन राजा भोज काळातील वास्तू म्हणून करतात आणि तिला सरस्वतीचे मंदिर मानतात. राजवंशाच्या काळात मुस्लिमांना काही काळ येथे नमाज अदा करण्याची परवानगी होती. दुसरीकडे, मुस्लिम समुदायाचे म्हणणे आहे की ते वर्षानुवर्षे येथे नमाज अदा करत आहेत. मुस्लिम त्याला भोजशाळा-कमाल मौलाना मशीद म्हणतात.

१९०९ मध्ये, धार संस्थानाने भोजशाळेला संरक्षित स्मारक घोषित केले. नंतर ते पुरातत्व विभागाकडे सुपूर्द करण्यात आले. त्याच्या देखभालीची जबाबदारी पुरातत्व विभागाची आहे. १९३५ मध्ये धार संस्थानानेच येथे शुक्रवारी नमाज अदा करण्यास परवानगी दिली होती. १९९५ मध्ये येथे वाद झाला होता. त्यानंतर या परिसरात  मंगळवारी पूजा करण्‍यास तर शुक्रवारी नमाज अदा करण्यास प्रशासनाने परवानगी दिली हाेती.

 हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news