नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
दिल्लीतील रोहिणी तुरुंगाच्या 82 अधिकारी – कर्मचाऱ्यांविरोधात पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. महाठग सुकेश चंद्रशेखर याच्याकडून हे लोक दरमहा दीड कोटी रुपयांची लाच स्वीकारत होते, असे पोलिसांनी 'एफआयआर' मध्ये म्हटले आहे.
सुकेशला वेगळे बरॅक उपलब्ध करून देणे, त्याला मोबाईल वापरण्याची मुभा देणे तसेच इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हे लोक लाच घेत असल्याचे उघडकीस आले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. फोर्टिस हेल्थकेयरचे माजी प्रवर्तक शिवइंदर सिंग यांच्या पत्नी आदिती सिंग तसेच काही अन्य धनाढ्य लोकांची फसवणूक केल्याचा आरोप सुकेश चंद्रशेखर याच्यावर आहे. यातील आदिती सिंग यांचीच दोनशे कोटी रुपयांची फसवणूक झालेली आहे.
आरोपी सुकेश याला रोहिणीच्या तुरुंग क्रमांक 10 मधील एका खोलीत ठेवण्यात आले होते. सुकेशला वेगवेगळ्या प्रकारची मदत केल्याच्या आरोपावरून याआधीच सात तुरुंग कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे. त्यानंतर आता 82 अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तिहार तुरुंगात असताना सुकेशने आदिती सिंग यांची 200 कोटी रुपयांची फसवणूक केली होती. गृह मंत्रालयाचा अधिकारी असल्याचे सांगत आवाज बदलून त्याने शिवइंदर सिंग याना कायद्याच्या कचाट्यातून सोडविण्याचे आमिष दाखवित हा पैसा उकळला होता. दरम्यान सुकेशच्या संदेशांची देवाणघेवाण करणाऱ्या नर्सिंग स्टाफविरोधातही लवकरच दिल्ली पोलिस कारवाई करणार असल्याचे समजते.
हेही वाचा :