पुणे : पुढारी वृत्तसेवा: आरटीओ कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्याविरुद्ध केलेल्या तक्रारी बंद करण्यासाठी, प्रादेशिक परिवहन अधिकार्याकडे एक कोटीची खंडणी गोळा करून देण्याची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी सचिन काशिनाथ गव्हाणे (रा. राजगुरुनगर) याला अटक केली असून, त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हा प्रकार 10 मे 2021 ते 27 जून 2022 दरम्यान घडला आहे. संबंधित प्रकरणात सरकारी अधिकार्यांवरील दोषारोप दाखल करण्यास लवकर परवानगी मिळावी, यासाठी सचिन याने सर्व अधिकार्यांना ई- मेल पाठविले आहेत. आरोपी सचीन गव्हाणे याचा भाऊ समीर याने सचिनच्या नावावर असलेल्या ट्रकची कागदपत्रे आरटीओ पिपंरी चिचंवड येथे सादर केली. त्या कागदपत्रावर सचीन याची सही समीर याने परस्पर स्वत:च केली. त्यानंतर ती गाडी विशाल टाव्हरे यांच्या नावावर करून दिली. याबाबत सचिन याने भोसरी एमआयडीसी येथे फिर्याद दिली होती.
त्यावरून त्याचा भाऊ समीर व तसेच तत्कालीन सहायक परिवहन अधिकारी सुबोध मेडशीकर व इतर कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. 2019 मध्ये हा गुन्हा दाखल केला गेला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तपास करून परिवहन आयुक्त मुंबई यांच्याकडे दोषारोप दाखल करण्याची परवानगीबाबत प्रस्ताव सादर केला आहे. तो अद्याप प्रलंबित आहे. याबाबत सचिन याने वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये केलेल्या ई-मेल व तक्रारी अर्जांमध्ये परिवहन अधिकारी व कर्मचारी यांच्याविरुद्ध तक्रारी केल्या आहेत.
तसेच दोषारोप दाखल करण्यास लवकर परवानगी द्यावी, यासाठी तो सातत्याने ई- मेल करीत असतो. गेल्या वर्षीपासून त्याने फिर्यादी अजित शिंदे यांच्या कार्यालयात येऊन आपण अधिकारी व कर्मचारी यांच्याविरुद्ध केलेल्या तक्रारी बंद करण्यासाठी या अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून 1 कोटी रुपये घेऊन देण्यासाठी मागणी शिंदे यांच्याकडे केली. शिंदे यांनी सुरुवातीला त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर ते यावर काही बोलत नाही, हे लक्षात आल्यावर त्याने स्वत:च 85 लाख रुपये एकतर्फी रक्कम शिंदेनी गोळा करून द्यावी, अशी वारंवार मागणी केली. शिंदे यांनी त्याला नकार दिला असता त्याने गव्हाणेला धमकी दिली.