Thane NCP: ठाणे राष्ट्रवादीत उभी फूट; शहराध्यक्षपदी सुहास देसाई यांची निवड

Thane NCP: ठाणे राष्ट्रवादीत उभी फूट; शहराध्यक्षपदी सुहास देसाई यांची निवड

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आणि राष्ट्रवादीत उभी फूट पडली. त्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांची मुख्य प्रतोद आणि विरोधी पक्षनेता म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली. अशावेळी राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी शरद पवार यांच्यासह आव्हाडांची साथ सोडून बंडाचे समर्थन केले. याची दखल घेऊन तातडीने परांजपे यांना बाजूला करून ठाणे शहर अध्यक्षपदी माजी नगरसेवक सुहास देसाई आणि कार्याध्यक्षपदी प्रकाश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यातून ठाणे राष्ट्रवादीतही (Thane NCP) उभी फूट पडल्याचे स्पष्ट झाले.

विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी रविवारी अचानक राष्ट्रवादीच्या (Thane NCP) आठ आमदारांसह भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्री आणि मंत्रिपदाची शपथ घेतली आणि राज्याच्या राजकारणात आणखीन एक भूकंप घडला. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमचा सरकारला पाठिंबा नसून बंडखोरांवर कारवाईची प्रक्रिया सुरु केली आहे. विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती करीत मुख्य प्रतोद म्हणूनही जबाबदारी देण्यात आल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केले. त्यामुळे ठाणे राष्ट्रवादी ही आव्हाड यांच्यामागे ठामपणे उभी राहील, असे चित्र असताना माजी खासदार आनंद परांजपे यांनी अजित पवारांसोबत जाण्याची भूमिका घेतल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

परांजपे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणण्याचे श्रेय आव्हाड यांना जात असून त्यांनीच त्यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. या नियुक्तीवर अन्य पदाधिकारी नाराजही झाले होते. आव्हाड हे नेहमीच परांजपे याच्या बाजूने उभे राहिले असताना परांजपे यांनी त्यांची साथ सोडली. त्यामुळे तातडीने अध्यक्षपदावरून परांजपे यांना हटवून माजी नगरसेवक सुहास देसाई यांची नियुक्ती करण्यात आली. सोबत कळव्यातील प्रकाश पाटील यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करून समतोल साधला आहे. या घडामोडीमुळे नाराज असलेल्या माजी नगरसेवक हे पवार यांच्यासोबत जातील आणि ठाणे राष्ट्रवादीमध्येही उभी फूट पडलेली दिसेल, असे राजकीय चित्र आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news