Sugar Industry : साखर उद्योगाचा केंद्रबिंदू उत्तरेकडे! उत्तर प्रदेशने घेतली आघाडी

Sugar Industry : साखर उद्योगाचा केंद्रबिंदू उत्तरेकडे! उत्तर प्रदेशने घेतली आघाडी

कोल्हापूर; राजेंद्र जोशी : देशात साखर उत्पादनात महाराष्ट्राने अव्वल स्थान कायम ठेवले असले, तरी उत्पादन मूल्याचा विचार करता साखर उद्योगाच्या राजधानीचे स्थान आता दक्षिणेकडून उत्तरेकडे स्थलांतरित होऊ लागले आहे. राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालानुसार उत्तरेकडील राज्यामधील कारखानदारीचे उत्पादन मूल्य गेल्या 8 वर्षांत 42 टक्क्यांनी वाढल्याचे निदर्शनास आले आहे, तर साखरेचा पट्टा म्हणून गेली अनेक दशके ओळखल्या जाणार्‍या दक्षिण भारतातील हेच उत्पादन मूल्य 32.4 टक्क्यांनी घसरले आहे. यामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक साखर उत्पादन होत असले, तरी उत्तर प्रदेश उत्पादन मूल्याच्या कसोटीवर देशात पहिल्या स्थानावर गेला आहे. (Sugar Industry)

साखर उद्योगाच्या या स्थित्यंतराला उत्तरेकडील राज्यांमध्ये ओलिताखाली आलेल्या क्षेत्रामध्ये झालेली वाढ जशी जबाबदार आहे, तशी उत्तरेतील राज्यांनी केंद्र सरकारने साखर उद्योगात उसासाठी निर्धारित केलेल्या वाजवी व लाभकारी मूल्यांहून उत्पादकाला दिलेला अधिक दर कारणीभूत ठरल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. यासाठी सांख्यिकी विभागाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमध्ये गतवर्षी उत्पादकांना उसाला सरासरी प्रति क्विंटल 340 रुपये इतका दर देण्यात आला, तर दक्षिणेकडील राज्यांमध्ये हेच मूल्य प्रति क्विंटल 280 ते 310 रुपयांच्या दरम्यान राहिले. यामुळे उत्तरेकडील राज्यात उसाच्या लागवडीकडे असलेला शेतकर्‍यांचा कल वाढतो आहे, तर उसाच्या मूल्यापोटी तुलनेने कमी दर मिळत असल्याने जादा दर मिळणार्‍या पिकांकडे दक्षिणेकडील राज्यांतील शेतकरी वळत असल्याचे चित्र समोर आले आहे. (Sugar Industry)

आकडेवारीने साखर उद्योगाचा केंद्रबिंदू दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकल्याचे निर्देशित केले आहेच. महाराष्ट्रात साखर उद्योगात हंगाम सुरू होण्यापूर्वी उसाच्या दरावरून प्रतिवर्षी कलगीतुरा झडतो आणि शेवटी समुद्रमंथनातून नवनीत निघावे, अशा रितीने कारखानदार उत्पादकांच्या हातात केंद्राने निर्धारित केलेली एफआरपी ठेवण्याला राजी होते. यामध्ये अडचणी पुढे करून एफआरपीचे तुकडेही पाडण्याची कसरत सुरू असते. (Sugar Industry)

इथेनॉल उत्पादनातही उत्तर प्रदेशची आघाडी

उत्तर प्रदेशात केंद्राच्या एफआरपीबरोबर राज्य शासनाने सुचविलेले मूल्य (स्टेट अ‍ॅडव्हायझरी प्राईस) याची दखल घेऊन उत्पादकांना अधिक मूल्य अदा करण्याची प्रथा रूढ झाली आहे. त्यामुळे तेथे साखरेबरोबर आता इथेनॉल उत्पादनानेही मोठी आघाडी घेतली असून, महाराष्ट्राला ही स्थिती अंतर्मुख करावयास लावणारी आहे.

अधिक वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news